उपवन तलावात पोहताना मुलगा बुडाला

ठाणे : उपवन तलावात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे करण सिंग हा १९ वर्षाचा मुलगा बुडाल्याची घटना मंगळवारी घडली. त्या मुलाला तलावामधून काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.

मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये या घटनेची नोंद झाली आहे. या घटनेची माहिती श्री. सत्यम यांनी व्यवस्थापन कक्षाला कळवली. करण सिंग मानपाडा पोलीस स्टेशनजवळ राहतो. घटनास्थळी वर्तकनगर पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचा एक कर्मचारी पिकअप वाहनासह, आपत्ती प्रतिसाद दलाचा एक जवान बससह आणि अग्निशमन दलाचा एक जवान, फायर वाहन व एक रेस्क्यू वाहनासह उपस्थित झाले होते.

करणला तलावामधून काढून वर्तकनगर पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले आहे.