निवडणुकीच्या धामधुमीत खाडीत भराव, चाळींची बांधकामे सुरू
ठाणे: गेल्या महिन्याभरापासून विटावा खाडीत मातीचे ट्रक रिकामे होत असून सद्य स्थितीत खाडीचा मोठा भाग बुजला आहे. भरावामुळे आणि त्यावरील बांधकामांमुळे येथे बॉटल नेक तयार झाला असून येणाऱ्या पावसाळ्यात खाडीचा प्रवाह अडून पाणी गावात शिरण्याची दाट शक्यता आहे.
काही महिन्यांपासून बंद असलेल्या अनधिकृत बांधकामांना निवडणुकीच्या धामधुमीत पुन्हा जोर चढला आहे. विटावा येथे कुंकाई परिसरात देखील काही दिवसांपासून खाडीत रोज मातीचे ट्रक रिकामे होत होते. सध्या येथील खाडीचा मोठा भाग बूजला असून खारफुटी जमीनदोस्त झाली आहे. या परिसराचे सपाटीकरणही दिवसाढवळ्या सुरू होते. जेसीबी आणि ट्रकचा वाढता वावर प्रभाग समितीच्या संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या दृष्टीस पडला नाही याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
अनधिकृत चाळी बांधण्यासाठी येथे भराव टाकण्यात आला असून अनेक बांधकाम धारकांनी विटांचे ढीग जागोजागी रचून ठेवल्याचे चित्र दिसत आहे. अनेकांनी पाया बांधकाम केले असून काही बांधकामे मातीखाली लपवून ठेवल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. आता आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामाचे कारण देऊन कर्मचारीही दुर्लक्ष करण्याची शक्यता येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
तक्रारी मिळाल्यानंतर गुरुवारी दुपारी कळवा प्रभाग समितीच्या एका कर्मचाऱ्याने विटाव्यात पाहणी केली. त्यांना तेथे जेसीबीही आढळून आला. मात्र कारवाई होणार की नाही असा प्रश्नही स्थानिक विचारत आहेत.
या भरावामुळे खाडीत बॉटल नेक तयार झाला असून येत्या पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अडून हे पाणी गावात शिरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा विटावासींसाठी परीक्षेचा काळ ठरणार असून मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भरावामुळे येथील खारफुटी उद्ध्वस्त झाली असून येथील जैविक संस्था नामशेष झाली आहे. एमआयडीसी आणि पोलीस प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याने या अनधिकृत बांधकामांना छुपा पाठिंबा असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.