* प्रचार मिरवणुकांमध्ये जोरदार घोषणाबाजी
* राडा होण्याआधीच पोलिसांची मध्यस्थी
ठाणे : प्रचारासाठी उमेदवारांना शेवटचा रविवार मिळाला असल्याने मिरवणुकांच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. राजकीय वातावरण तापले असतानाच आज ठाण्यातील वर्तकनगर भागात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मिरवणुका दोनवेळा समोरासमोर आल्या. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन आणि घोषणाबाजी झाल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते. मात्र राडा होण्याआधीच पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.
ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आणि महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी सकाळपासूनच शहरात भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. मात्र या प्रचार मिरवणुका एकदा नव्हे तर दोन वेळा समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला.
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांची मिरवणूक लोकमान्यनगरवरून वर्तकनगर नाका येथे पोहचली. त्याचवेळी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार खासदार राजन विचारे यांची रॅली वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या दिशेकडून वर्तकनगर नाक्यावर आली.
एकमेकांसमोर मिरवणुका येताच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजीतच दोन्ही मिरवणुकांनी आपला पुढचा रस्ता धरला. पण भीमनगरला पुन्हा दोन्ही गट समोरासमोर आले. येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालण्यासाठी दोन्ही गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आले होते. यावेळीही त्यांनी घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुदैवाने दोन्ही गटाचे उमेदवार हजर नव्हते. अन्यथा कार्यकर्त्यांच्या ‘उत्साहाचे’ रुपांतर राड्यात होण्याची शक्यता होती. दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.