कल्याणात शिंदे यांना हॅटट्रिकचा विश्वास
भिवंडीत अँटी इन्कंबन्सीची भीती
ठाणे: लोकसभा निवडणुकीचे देशातील सातही टप्पे पार पडले असून बहुतांशी एग्सिट पोलने भाजप प्रणित आघाडीच्या पारड्यात पुन्हा वजन टाकले आहे. या पोलमुळे देशभर उत्साहाचे वातावरण दिसत असले तरी मुख्यमंत्र्यांचे ठाणे असलेल्या जिल्ह्यात तीनपैकी ठाणे आणि भिवंडी मतदारसंघात काय घडेल याबाबत राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि नागरिकांची उत्कंठा शिगेला ताणली गेली आहे.
महाराष्ट्र राज्यात कोण बाजी मारणार याची अंदाज एक्सिट पोलने बांधला आहे. मात्र त्याचवेळी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघातही कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला ताणली गेली आहे. या तीन लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान पार पडले. या तीन लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल ७९ उमेदवार रिंगणात होते. मात्र खरी लढत होती ती राजन विचारे आणि नरेश म्हस्के, कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे तसेच डॉ. श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर या तीन उमेदवारांमध्ये. यातील ठाणे आणि कल्याणमधील लढत ही शिवसेनेच्या दोन गटात होती तर भिवंडीत भाजपा विरुद्ध शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात होती. अर्थातच खरी शिवसेना कोणत्या गटाची असा वाद सुरू असताना आता ठाणे कोणत्या शिवसेनेचे अशी अहमहमिका पाहायला मिळाली.
महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण पश्चिम येथे भव्य सभा झाली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही डोंबिवली व ठाण्यात दोन सभा घेतल्या. शरद पवार यांनीही शहापूर, भिवंडी, कल्याण येथे झंझावाती सभा घेतल्या. दिल्लीचे आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शेवटच्या टप्प्यात सभा गाजवली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला. या सर्वांचा परिपाक मतदानाच्या रुपाने कुणाच्या बाजूने आहे, याचा निकाल ४ जूनला लागणार आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सत्ता, आर्थिक रसद अशी भक्कम बाजू महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या बाजूने होती. मात्र त्याचवेळी त्यांच्या उमेदवारीवर भाजपच नव्हे तर शिंदे गटाचे पदाधिकारी-कार्यकर्तेही नाराज असल्याचे दिसत होते. मीरा-भाईंदरमध्ये भाजप आणि नवी मुंबईत नाईक कुटूंब यांची नाराजीही असल्याने श्री.म्हस्के यांनी ही अग्नीपरिक्षाच होती. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर त्यांना मतांचा डोंगर उभा करणे त्यांना अशक्यच दिसत होते.
दुसरीकडे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यासोबत पदाधिकार्यांची मोठी फौज नसली तरी तळातील कट्टर शिवसैनिक त्यांच्यासोबत ठाम उभा असल्याचे यावेळी पहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभुती आणि सर्वांना अंगावर घेणारा निष्ठावंत अशी प्रतिमा तयार करण्यात ते यशस्वी झाले. या मतदारसंघात दोन्ही शिवसेनेत काटे की टक्कर आहे. पण खासदार राजन विचारे यांच्या बाजूने तळागाळातील मतदारांचा कौल अधिक असल्याचे पहायला मिळाले. झोपडपट्टी, मुस्लिम बहूल भागातून त्यांना एकगठ्ठा मते मिळाल्याचा अंदाज आहे. त्यात वंचितची ४६ हजार मतेही त्यांच्या खात्यात वळती झाल्याचे समजते. नवी मुंबईत नाईक कुटुंबियांच्या असहकाराचा फायदाही विचारे यांना मिळताना दिसतो. कोपरी- पाचपाखाडी, ठाणे शहर या दोन विधानसभा मतदारसंघात जो लीड घेईल तोच विजयाची माळ गळ्यात घालेल अशी चर्चा आहे. येथून नरेश म्हस्के यांना अपेक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा करिष्मा चालला तर नरेश म्हस्के हे पालिकेतून थेट संसद भवनात दिसतील.
भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील विरुद्ध महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्यात लढत झाली. सुरुवातीला या मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्यामुळे तिरंगी लढत पहायला मिळाली. पण प्रचार ऐन रंगात येत असताना सांबरे बॅकफूटवर गेले. या मतदारसंघातून कपिल पाटील हे तिसर्यांदा खासदार बनण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या या स्वप्नांना बाळ्या मामा सुरुंग लावणार असा कल दिसतो. त्यामुळे भिवंडीत पुन्हा कमळ फुलणार की तुतारी वाजणार हे ४ जूनलाच समजेल.
कल्याण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदें हे निर्विवाद विजयाची हॅट्रीक मारणार असे दिसते. मात्र त्यांना अपेक्षित असलेली रेकॉर्ड ब्रेक मते मिळण्याची आशा मावळली आहे. या मतदारसंघात त्यांची थेट लढत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासोबत होती. ठाण्यात जशी दोन शिवसेनेत चुरशीची लढाई पहायला मिळाली तशी ती कल्याणमध्ये दिसली नाही. तरीही कल्याण आणि कळवा-मुंब्रा भागात शिंदे यांना मतदारांनी घाम फोडल्याची माहिती मिळते.