मलनिस्सारणाची टाकी साफ करताना दोघांचा मृत्यू

ठाणे : पाण्याची टाकी साफ करताना दोन कामगार मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच आज मुंब्रा येथील कौसा परिसरातील मलनिस्सारणची टाकी साफ करताना दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हनुमान कोरपक्वाड (२७) आणि सुरज मढवी असे मृत्यू पावलेल्या कामगारांची नावे आहेत. ते दोघेही डोंबिवली येथे राहणारे आहेत. कौसा स्टेडियमच्या बाजूला असलेल्या ग्रेस स्क्वेअर सोसायटीच्या आवारातील मलनिस्सारणची टाकी साफ करण्यासाठी डोंबिवली येथे राहणारे हे दोन मजूर आले होते. सायंकाळी ६.३०च्या दरम्यान हे दोघे टाकी साफ करत असताना बेशुद्ध पडले. त्यांना इमारतीच्या रहिवाशांनी टाकीबाहेर काढून त्यांना जवळच्या प्राईम केयर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.