बोरिवडे मैदान गिळंकृत : मनसेचा आंदोलनाचा इशारा

ठाणे : ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार बोरीवडे मैदानाचे आरक्षण असून देखील, महापालिका अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे ते डंपिंग ग्राउंड बनले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. दरम्यान पालिकेने हे अतिक्रमण त्वरीत हटवावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी दिला आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात विविध जागांच्या आरक्षणाचा उल्लेख असून, काही ठिकाणी विकासकांकडून टीडीआरमार्फत विकासकामे केली जातात. घोडबंदर क्षेत्र हे जलद गतीने विकसित होत असून, येथे हावरे, रौनक, भूमीसारखे मोठे विकासक काम करत आहेत. मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढल्याने ठाणे महानगरपालिकेने बोरिवडे येथे एक खेळाचे मैदान आरक्षित ठेवले आहे. पण या परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक मुलांना खेळण्यासाठी हक्काचे मैदान उपलब्ध नाही. ठेकेदाराने मैदानाच्या बहुतेक जागेवर कब्जा केला असून, तिथे शेड उभारली आहे आणि पाईपची साठवणूक केली आहे. ठेकेदार हे पाईप त्याच्या वैयक्तिक कामासाठी वापरत असल्याने स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठाणे शहरात अनेक मैदाने आहेत. मात्र, या मैदानावर अतिक्रमण केल्यामुळे मुलांना हक्काचे मैदान खेळण्यासाठी मिळत नसल्याची परिस्थिती आहे. अनेक शाळांना मैदान नसल्यामुळे रहिवासी परिसरातीलही मैदाने विकासकांकडून गिळकृंत केली जात असल्याने मुले मैदानापासून वंचित राहत आहेत.