ठाणे : शहरात बसवण्यात आलेले पाण्याचे मीटर सदोष असल्याने अवाजवी बिले मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या असतानाच या मीटरच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराऎवजी पालिकेवरच कोट्यवधींचा बोजा पडणार आहे. तशी तरतूदच अर्थसंकल्पात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पाणी चोरी, गळती रोखण्यासाठी स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १ लाख १३ हजारपैकी ७० हजार मीटर बसविण्यात आले असून ३८ हजार मीटरवर बील आकारले जात आहे. परंतु या स्मार्ट मीटरचा कारभार मागील काही महिन्यांपासून वादादीत राहिला आहे. अनेक मीटर सदोष आढळले आहेत. अनेक नागरिकांना चुकीच्या पध्दतीने बिले गेली आहेत. काहींना तर तीन महिन्यांचे थेट १२ लाखापर्यंत बिल गेले आहे. या मीटरची निगा देखभालीची पाच वर्षांची जबाबदारी ही संबंधित ठेकेदाराची असतानाही त्यासाठी स्थायी समितीने अर्थसंकल्प मंजुर करताना ३ कोटींचा निधी प्रस्तावित केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. स्मार्ट सीटी अंतर्गत ठाणे शहरात एक लाख १३ हजार स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत. त्यानुसार आतापर्यंत ७० हजार स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून त्या मीटरनुसार ठाणेकरांना तीन महिन्यांनी पाण्याचे बील पाठविण्यात येत आहे. पहिल्यांदा बील पाठवले तेव्हा ती बिले अधिकची पाठवली असा आरोपही झाला. तसेच हा विषय लोकप्रतिनिधींनी महासभेत आणून त्यावर चर्चा केली. परंतु काही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. त्यातही महापालिकेने बसवलेल्या एकूण ७० हजार मीटरमध्ये अपवाद मुंब्रा सोडून जवळपास प्रामुख्याने गृहसंकुलांचा समावेश आहे. तर दुसरीकडे झोपडपट्टीत अजून सर्वत्र स्मार्ट मीटर बसविण्यात आले नाहीत. परंतु स्मार्ट मीटरमध्ये अनेक दोष असल्याचे यापूर्वी देखील उघड झाले आहेत. हे मीटर वारंवार बंद पडत आहेत, त्यामुळे योग्य रिडींग मिळत नाही. याशिवाय मीटर बसविण्यात आल्यानंतरही चुकीच्या पध्दतीने नागरिकांना बिले वाटप झाली आहेत. त्यावरुनही गदारोळ झालेला आहे. तसेच या स्मार्ट मीटरसाठी करण्यात आलेल्या खर्चावरुन देखील आक्षेप घेतले जात आहेत.
दरम्यान दुसरीकडे या स्मार्ट मीटरच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च हा पुढील पाच वर्षे संबंधित ठेकेदाराने करायचा आहे. असे असतानाही स्थायी समितीने अर्थसंकल्पात सुधारणा करताना त्यासाठी तीन कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे ही तरतूद कशासाठी आणि कोणाच्या फायद्यासाठी करण्यात आलेली आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
मीटर बाबत आलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी एक सेल तयार करण्यात आलेला आहे. त्याच्याकडून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले जात आहे. अधिकचे बिल दिले गेले असेल तर कमी करुन दिले जात असल्याची माहिती यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे.