* बोटींमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक
* लाइफ जॅकेटसारख्या सुरक्षा साधनांचा अभाव
ठाणे : मुंबईच्या समुद्रात प्रवासी बोट दुर्घटनाग्रस्त होऊन तब्बल १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ठाण्यातील तलावांमधील नौकाविहारच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तलावांमध्ये पर्यटनासाठी नौकानयनासाठी असलेल्या बोटीमध्ये मर्यादेपक्षा जास्त पर्यटक कोंबले जात असून लाईफ जॅकेट परिधान केले जात नाहीत, त्यामुळे बिकट प्रसंग ओढवलाच तर पर्यटकांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे.
ठाणे शहरातील मासुंदा तलाव हे ठाणेकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. सध्या महापालिका क्षेत्रात मासुंदा, उपवन, आंबे-घोसाळे व खारीगांव या प्रमुख चार तलावांमध्ये बोटिंग सेवा ठेकेदारामार्फत सुरू आहे. शनिवार, रविवार तसेच सुट्टयांच्या दिवशी या तलावांवर बोटींगसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी असते. परंतु पर्यटकांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा न पुरविता पेडल बोट उपलब्ध करुन दिल्या जातात. तसेच प्रवासी बोटीत क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक बसविले जात असल्याच्या तक्रारी आहेत. ठेकेदाराकडे सुरक्षा साहित्य उपलब्ध असताना देखील ते वापरले जात नसल्याची गंभीर समोर आली आहे.
तलावात पेडल बोटीला जास्त मागणी असून या बोटीवर स्वतः पर्यटकांचेच नियंत्रण असते. हे पर्यटक तलावांमध्ये बोटिंगसाठी जाताना लाईफ जॅकेट घालत नाहीत. काही जण तर कपड्यांची इस्त्री मोडून कपडे खराब होऊ नयेत म्हणून लाईफ जॅकेट घालत नसल्याचे एका ठेकेदाराने सांगितले.
पर्यटकांचा जीव धोक्यात घालणारी बाब निदर्शनास येताच तलावांच्या सर्व ठेकेदारांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. बोटींगमध्ये सुरक्षा जॅकेट घातल्याशिवाय बोट पर्यटकांच्या ताब्यात देवू नये, तसेच याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बोटींग परिसराच्या दर्शनी भागात नियमावली लावण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.