वसईत नायब तहसिलदारासह मंडळ अधिकारी लाच घेताना अटक

वसई : नायब तहसिलदार प्रदीप मुकणे आणि मंडळ अधिकारी संजय सोनावणे यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विरोधी विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.

मुंबईतील एका व्यक्तीने आपल्या वसईतील जमिनीबाबत फेरफार नोंद करण्यासाठी मुकणे यांच्याकडे विनंती केली. ही नोंद करण्यासाठी प्रदीप मुकणे यांनी दीड लाख तर मंडळ अधिकारी संजय सोनावणे यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. या बाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली असता लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून नायब तहसिलदार प्रदीप मुकणे यांना व मंडळ अधिकारी संजय सोनावणे यांना रंगेहाथ अटक केली.

महसूल विभागातील दोन अधिकाऱ्यांना एकाच दिवशी अटक करण्यात आल्याने वसईतील महसूल विभागाचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. या अगोदरही वसई तहसिलदार कार्यालयातील तत्कालीन तहसिलदार अनंत संख्येसह त्यांचा वाहन चालक जाधव व लिपिक यांना लाचलुचपत विभागाने अटक केली होती.