महिलांची ‘आयपीएल’ लवकरच!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांचे आश्वासन

पुरुषांप्रमाणेच महिलांची पूर्ण स्वरूपातील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लवकरच खेळवण्यात येईल, असे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी दिले.

महिला क्रिकेटचा प्रसार करण्याच्या दृष्टीने ‘बीसीसीआय’ने २०१८ मध्ये सर्वप्रथम पुरुषांच्या ‘आयपीएल’दरम्यानच महिलांचा ट्वेन्टी-२० सामना खेळवला. त्या वेळी सुपरनोव्हाज आणि ट्रेलब्लेझर्स हे दोन संघ त्या लढतीत खेळले. त्यानंतर २०१९ मध्ये व्हेलोसिटी संघाची भर पडल्याने या तीन संघांच्या स्पर्धेला ‘महिला ट्वेन्टी-२० चॅलेंज’ असे नाव देण्यात आले. या दोन्ही वेळेस हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील सुपरनोव्हाज संघ जिंकला. मग नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या अखेरच्या पर्वात स्मृती मानधनाच्या ट्रेलब्लेझर्स संघाने सुपरनोव्हाजला नमवून पहिले जेतेपद पटकावले. तर मिताली राजच्या नेतृत्वाखालील व्हेलोसिटी संघाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

गतवर्षी या स्पर्धेचे आयोजन होऊ शकले नाही. परंतु गेल्या काही वर्षांत भारतीय महिला संघाने ट्वेन्टी-२० प्रकारात चमकदार कामगिरी केल्यामुळे भविष्यात तीनऐवजी पुरुषांप्रमाणेच आठ अथवा किमान सहा संघांची ‘आयपीएल’ खेळवण्यात यावी, अशी मागणी महिला संघातील खेळाडू, चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी केली. त्यातच आता या वर्षात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन झाल्यामुळे महिलांच्या ‘आयपीएल’ आयोजनाची शक्यता बळावली आहे.

‘‘महिलांच्या ‘आयपीएल’साठी चाहत्यांमध्ये दिसून येणारा उत्साह नक्कीच कौतुकास्पद आहे. ‘बीसीसीआय’ पुढील वर्षाच्या प्रारंभी भारतातच ही स्पर्धा खेळवण्याचा विचार करत आहे. यामुळे देशातील असंख्य युवा महिला क्रिकेटपटूंना कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. तसेच अधिक परदेशी खेळाडूंच्या समावेशामुळे महिला क्रिकेटचा आपोआप प्रसार होईल,’’ असे शहा म्हणाले. ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीनेसुद्धा शहा यांच्या मताला दुजोरा दिला आहे.

पाकिस्तानविरुद्ध लढतीबाबत मौन!

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजाने गेल्या महिन्यात भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दरवर्षी चार देशीय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याबाबत शहा यांनी स्पष्टपणे मत व्यक्त करणे टाळले. ‘‘तूर्तास भारतात मार्च-एप्रिल महिन्यात पुरुषांच्या ‘आयपीएल’चे यशस्वीरीत्या आयोजन करण्यावर आमचे लक्ष्य आहे. त्यानंतर स्थानिक क्रिकेट हंगाम आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकाला आमचे प्राधान्य असेल,’’ असे शहा म्हणाले. याव्यतिरिक्त, क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये समावेश मिळवून देण्यासाठी ‘बीसीसीआय’ प्रयत्नशील असल्याचे शहा यांनी सांगितले.