महाव्यवस्थापकांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती
ठाणे: पूर्व ठाण्यात सुरू असलेल्या सॅटीसच्या कामात रेल्वे खातेच अडथळे निर्माण करत असून त्याबाबत झालेल्या बैठकीत महाव्यवस्थापकांनी त्यांच्या अधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत. त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार रेल्वेकडे असलेले काम तातडीने हाती घेण्यात येईल आणि सॅटीस २०२५च्या पावसाळ्यापर्यंत पूर्णत्वास जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
यावेळी ठाणेवैभवशी बोलताना महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानकाबाहेर सुरू असलेले काम झपाट्याने सुरू करण्यात आलेले आहे. परंतु स्टेशनबाहेरील डेकचे काम आणि एका आठ मजली वाणिज्य वापराची इमारत यांचे आराखडे मंजूर करण्यात रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अक्षम्य दिरंगाई केली. साधारणतः २०२० साली सादर झालेले हे आराखडे २०२४ साली रेल्वे अभियंते फेरफार करण्यात का करत आहेत. रेल्वे स्थानकाबाहेर साधारणतः सहा मिटर खोलीचे खड्डे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या ठेकेदाराने खणून ठेवले आहेत. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांच्या असहकारामुळे तेथे काहीही काम होऊ शकलेले नाही. रेल्वे खात्याने ही चालढकल केली नसती तर या पावसाळ्यापूर्वी पूर्व ठाण्याचे सॅटीस खुले झाले असते, असेही या सूत्राने सांगितले.
ठाणे पश्चिमेस असलेल्या सॅटीसपेक्षा पूर्व ठाण्याच्या सॅटीसचा डेक तिप्पट मोठा आहे. या डेकवरून बेस्टच्या बसेस, नवी मुंबई, मीरा-भाईंदर परिवहन बसेस आणि टीएमटीच्या बसेस सुटणार असल्याने हा डेक ७५०० चौरस मीटरचा करण्यात आला आहे. ठाणे-मुलुंड दरम्यान होणाऱ्या नियोजित रेल्वे स्थानकासाठी या डेकवरून बसेस सुटतील, असेही समजते.
रेल्वेच्या या आडमुठेपणाचा फटका यापूर्वी कोपरी पुलाच्या कामावेळी बसला होता. हीच नीति त्यांनी सॅटीसबाबतीत वापरली आहे. महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी ठाण्यात येऊन आपल्या अभियंत्यांची झाडाझडती घेतली आणि हे काम तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले.