तीन हात नाका येथे प्रायोगिक तत्वावर बसवणार सिग्नल यंत्रणा
ठाणे : ठाण्यातील अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या तीनहात नाका परिसरात दृष्टिहीनांसाठी ग्रीन सिग्नल बसवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.
तीन हात नाका या ठिकाणी एकूण सात रस्ते एकत्र मिळत असल्याने या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड वर्दळ असते. येथील प्रत्यक्ष अभ्यास आणि सर्वेक्षण करुन येथे ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रायोगिक तत्ववार सुरुवातीला तीनहात नाका या ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार असून त्यानंतर टप्प्या टप्प्याने ठाण्यातील महत्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाणे शहरामध्ये १५ जानेवारीपासून वाहतूक सुरक्षा अभियान राबवण्यात येत असून हे अभियान पुढील एक महिना कालावधीपर्यंत सुरु राहणार आहे. या अभियानांतर्गत रस्त्यावरील वाहतुक सुरक्षा, वाहतुकीचे नियमन, पादचारी सुरक्षा, अपघात होऊ नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना तसेच जनजागृती मोहिम वाहतूक विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून रस्त्यांवरील चौकाच्या ठिकाणी दृष्टिहीन पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा या करीता ग्रीन सिग्नल व्यवस्था तयार करणे, विशेष करुन दृष्टीहीन आणि दिव्यांग लोकांना सिग्नलवर रस्ता ओलांडणे सुलभ, सुरक्षित व्हावे, याबाबत सदर सुरक्षा अभियाना अंतर्गत वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी ही संकल्पना मांडली आहे. त्या अनुषंगाने याबाबतीत शहर वाहतुक शाखा तसेच ठाणे महानगरपालिका मिळून एकत्रपणे ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहर वाहतुक विभागामार्फत अशा प्रकारचे काम करणाऱ्या विविध सेवाभावी संस्था यांचेमार्फत प्रत्यक्ष जागेचे सर्वेक्षण करुन दरपत्रके प्राप्त करुन घेतली असून ३० जानेवारी रोजी खर्चाबाबत मंजुरी प्रक्रिया पूर्ण करुन प्रत्यक्ष काम करणेकरीता ठाणे महानगरपालिकेकडे पत्राव्दारे सदरची दर पत्रके पाठवली आहेत.
ही यंत्रणा बसवण्यासाठी १४ लाख ८२ हजार खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. रस्ते नुतनीकरण या शिर्षकांतर्गत करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे ही ग्रीन सिग्नल यंत्रणा बसवल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसोबतच जे दृष्टिहीन आहेत त्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.
अशी आहे ग्रीन सिग्नल यंत्रणा
ग्रीन सिग्नल यंत्रणा ही विशिष्ट स्वरूपाची यंत्रणा असते. यामध्ये अनेक कामांचा समावेश करण्यात आला आहे. सिग्नल यंत्रणामध्ये सुधारणा करणे, बिपरची व्यवस्था करणे, दृष्टीहीन व्यक्तींना पायाचे स्पर्शाने अथवा हातामधील काढीने मार्ग समजण्यासाठी दृष्टीहीन लोकाकरीता जगभर वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट स्वरुपाच्या टाईल्स बसविणे या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे.