काळा तलाव सुशोभीकरण डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची माहिती

कल्याण : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेले काळा तलावाच्या सुशोभीकरणाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे दिली. कल्याणवासीयांना नव्या वर्षाची भेट म्हणून सुशोभित काळा तलाव मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

कल्याण-डोंबिवली महापालिका अंतर्गत स्मार्टसिटी योजनेनुसार ऐतिहासिक काळा तलावाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. या कामाची केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज पाहणी केली. या वेळी माजी आमदार नरेंद्र पवार, महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे आदी उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त वतीने काळा तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या वेळी कपिल पाटील यांनी काळा तलाव परिसरात आलेल्या नागरिकांशीही संवाद साधला.

काळा तलावालगत राहणाऱ्या कुटुंबांना क्लस्टर योजनेअंतर्गत घरे देता येतील का, याबाबत आयुक्त भाऊसाहेब तांगडे यांच्याकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच बीएसयूपी योजनेतही त्यांच्या समावेशाबाबत चाचपणी केली जाईल, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. सर्व नागरिकांनी एकत्र येऊन काळा तलाव आणखी सुंदर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले.