राहुल गांधींचे आरक्षणविरोधी वक्तव्य प्रकरण
ठाणे : दलित व आदिवासी समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपा ठाणे शहर जिल्ह्यातर्फे `कॉंग्रेस हटाओ, आरक्षण बचाओ’ आंदोलन करण्यात आले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोर्टनाका येथील पुतळ्यासमोर आमदार संजय केळकर आणि जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात कॉंग्रेसचा धिक्कार करण्यात आला. तसेच कोणत्याही परिस्थितीत आरक्षण हिसकावू दिले जाणार नाही, असा इशारा आंदोलनाद्वारे देण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेले आरक्षण हिसकावून घेण्याची मानसिकता कॉंग्रेसच्या नेत्यांची आहे. अमेरिकेतील दौऱ्यात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आज `कॉंग्रेस हटाओ, आरक्षण बचाओ’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांसह नागरिक सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्या वक्तव्यातून कॉंग्रेसचा खरा चेहरा हा जनतेसमोर आला आहे, याकडे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी लक्ष वेधले. तर कॉंग्रेसच्या नेत्यांची कायम आरक्षणविरोधी मानसिकता राहिली असल्याची टीका आमदार संजय केळकर यांनी केली.
आंदोलनात माजी नगरसेवक मुकेश मोकाशी, माजी नगरसेविका दीपा गावंड, जिल्हा सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम भोईर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, विद्या शिंदे, सुरेश पाटील, सचिन केदारी, अल्केष कदम, राकेश जैन, वृषाली वाघुले यांच्यासह विविध मंडलांचे अध्यक्ष व पदाधिकारी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.