चिखलगाव ग्रामपंचायतीत भाजपाची एकहाती सत्ता

चिखलगावात कमळ फुलले

शहापूर: सोगाव जिल्हा परिषद गटातील चिखलगाव ग्रामपंचायतीवर भाजपच्या पॅनेलने जोरदार मुसंडी मारत सरपंचपदासह पाच सदस्य निवडून आणत एकहाती वर्चस्व निर्माण केले आहे. प्रथमच चिखलगाव ग्रामपंचायतीवर कमळ फुलले आहे.

यापूर्वीही दोन महिन्यांपूर्वी सोगाव पंचायत समिती गणातील सहापैकी शिरवंजे-वाचकोले, खरीवली सो, नडगाव-नांदगांव व आत्ता चिखळगाव या ग्रामपंचायती भाजपने पंचायत समितीचे सदस्य सुभाष हरड यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत. चिखलगाव, गुंड्याचापाडा, मोहिपाडा, बर्डेपाडा, कातकरीवाडी या गावांची मिळून चिखलगाव ग्रामपंचायत आहे.

१८ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी एक हजार मतदान झाले होते. थेट सरपंच पदासाठी तीन उमेदवार रिंगणात होते. भाजपच्या पॅनेलचे बाबू वाघ यांनी ५१६ मते घेऊन ते १५४ मतांच्या लीडने विजय होऊन सरपंचपदी विराजमान झाले आहेत. येथे प्रथमच भाजपचा झेंडा रोवला गेला आहे.

प्रभाग क्रमांक ३ (मोहिपाडा व बर्डेपाडा) मध्ये चुरशीच्या झालेल्या सदस्य पदाच्या निवडणुकीत दामोदर अनंता देसले (बर्डे पाडा) हे २१९ मते घेऊन २१ मतांच्या लीडने विजयी झाले. तर महिला सदस्य पदासाठी सुजाता देसले (मोहिपाडा) यांनी २९० मते घेऊन १७२ मतांच्या लीडने प्रचंड मतांनी विजयी झाल्या आहेत. बाबू वाघ हे गुंड्याचापाडा प्रभागमधून सदस्यपदी १४८ मते घेऊन विजयी झाले आहेत.

केंद्रीय पंचायती राज विभागाचे राज्यमंत्री कपिल पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा गटनेते सुभाष हरड, शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, तालुका उपाध्यक्ष मगन मलिक, तालुका चिटणीस शंकर वेखंडे यांच्या नेतृत्वाखाली चिखलगाव ग्रामपंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता आली आहे. चिखलगाव ग्रामपंचायतीवर थेट सरपंचपदी भाजपचे बाबू वाघ तर सदस्यपदी दामोदर देसले, सुजाता देसले, दीप्ती देसले, सतीश देसले, बाबू वाघ हे ५ सदस्य भाजपचे निवडून आले आहेत.