मंत्रिमंडळात कोण? केळकर, कथोरे, सरनाईक की किणीकर?
ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये जिल्ह्यातील किती जणांची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी भाजपचे रविंद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्यात रस्सीखेच सुरू असून हे पद चव्हाण यांच्या पारड्यात पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिंदे समर्थक आणि भाजपा यांचे सरकार स्थापन करण्यात येणार आहे या सरकारमध्ये जिल्ह्यातील भाजपचे गणेश नाईक, रविंद्र चव्हाण आणि किसन कथोरे तर शिवसेनेतून प्रत्ताप सरनाईक, बालाजी किणीकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. ठाण्याला मुख्यमंत्रीपद मिळाले असून सेनेचे प्रतिनिधित्व असावे यासाठी श्री. सरनाईक यांची वर्णी लागून त्यांना किमान राज्यमंत्री तरी केले जाईल, असे बोलले जात आहे तर बालाजी किणीकर हे दलित असल्याने त्यांना मंत्रीमंडळात घेऊन मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व दिल्याचे देखील साध्य होणार आहे, त्यामुळे त्यांचा देखील नंबर मंत्रिमंडळात लागण्याची दाट शक्यता आहे. भाजपचे गणेश नाईक हे अनुभवी नेते आहेत. राष्ट्रवादीला रामराम ठोकून ते भाजपात आले आहेत. त्यांच्याकडील अनुभवामुळे त्यांना देखील कॅबिनेट मंत्री केले जाऊ शकते तर रविंद्र चव्हाण हे फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री होते, फडणवीस यांचे ते खंदे समर्थक आहेत. कोकणात त्यांचे वजन आहे त्यामुळे त्यांची बढती होऊन त्यांना देखील कॅबिनेट मंत्री केले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून भाजपाचे चव्हाण आणि नाईक यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही नेते हे पद मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पालकमंत्री पद रविंद्र चव्हाण यांना मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या कामाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले होते, त्यामुळे त्यांची देखिल मंत्री मंडळात वर्णी लागेल असा विश्वास व्यक्त केला आहे. याबाबत श्री. केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आधी देश, नंतर पार्टी आणि नंतर स्वतः या पक्षाच्या घोषवाक्यावर ठाम असल्याचे सांगितले. पक्ष जी जबाबदारी देईल, ती स्वीकारून समर्थपणे पार पाडू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.