कल्याण पूर्वेत शिंदे गटाकडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण

कल्याण : कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात कुरबुरी सुरू असल्याचे आज पुन्हा एकदा समोर आले. कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात भाजपचे चिन्ह भिंतीवर रंगवत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या नगरसेवकाच्या समर्थकांनी विरोध करत बेदम मारहाण केली.

या घटनेनंतर भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे यांनी आपल्या नगरसेवकांना आवरा अन्यथा आम्ही हात सोडू, असा इशारा शिवसेना शिंदे गटाला दिला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांकडून युतीत आलबेल असल्याचे सांगितले जात असले तरी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट व भाजपामध्ये कुरबुरी सुरूच असल्याचे दिसून येत आहे. कल्याण चक्की नाका टेकडी परिसरात भाजपा कार्यकर्त्यांकडून भिंतींवर भाजपच्या पक्ष चिन्हाचे चित्र रंगवण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान शिंदे गटाचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे समर्थक त्या ठिकाणी आले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना विरोध करत तीन ते चार कार्यकर्त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण कली.

शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या सांगण्यावरूनच भाजप कार्यकर्त्याना मारहाण झाल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला. यावेळी भाजप कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे यांनी तुमच्या नगरसेवकांना आवरा अन्यथा आम्ही हात सोडू असा इशारा शिवसेना शिंदे गटाला दिला आहे. भाजप शहर अध्यक्षासह कार्यकर्ते कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल होऊन घडल्या प्रकाराबाबत तक्रार देणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.