ठाणे महापालिकेच्या सत्तेत भाजपला द्यावा लागणार वाटा

राज्यातील सत्तांतराचा महापालिकांमध्ये उमटणार पडसाद

ठाणे : एकनाथ शिंदे यांना भाजपच्या मदतीने राज्यात मुख्यमंत्रीपद मिळाल्याने त्यांचे वर्चस्व असलेल्या महापालिकांमध्ये भाजपला वाटा मिळणार हे स्पष्ट झाले आहे. ठाणे महापालिकेतही भाजपला महत्वाचा वाटा मिळणार हे चित्र प्रथमदर्शनी स्पष्ट दिसत आहे.

नऊ दिवसांच्या राजकीय महानाट्यानंतर अखेर राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आले आहे. शिवसेनेपेक्षा जास्त संख्याबळ असतानाही पक्षश्रेठींच्या आदेशाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. राज्यात भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असून याचा परिणाम ठाण्याच्या राजकारणावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मनाला जातो. गेल्या ३० वर्षांपेक्षा अधिक काळ ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे महापौरांसह पालिकेतील महत्वांच्या पदावर देखील शिवसेनेच्याच नगरसेवकांनी आतापर्यंत वर्णी लागत आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आगामी ठाणे महापालिकेची निवडणूक एकत्र लढवावी अशी मागणी राष्ट्रावादी कडून होत होती. माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील पालिका निवडणुक राष्ट्रावादी आणि शिवसेनेने एकत्र लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवसेना मात्र सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी सोबत निवडणूक लढवण्यास तयार नव्हती. माजी महापौर नरेश म्हस्के यांनी तर मिशन शिवसेना अशी घोषणा करून पालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे ठाण्यातही शिवसैनिक हे राष्ट्रवादी सोबत जाण्यास इच्छुक नव्हते हे आधीच स्पष्ट झाले होते.

ठाणे महापालिकेत सर्वाधिक ६७ नगरसेवकांचे संख्याबळ हे शिवसेनेकडे होते.त्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेस ३४ तर भाजपच्या नगरसेवकांची संख्या २४ होती. ठाण्यात काँग्रेसची ताकद नगण्य आहे. राज्यातील या सर्व राजकीय घडामोडीनंतर शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट असा संघर्ष निर्माण झाला असला तरी, ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे प्राबल्य आहे. तर आता भाजप आणि एकनाथ शिंदे गट असे सरकार असल्याने ठाण्यात सत्तेपासून दूर असलेल्या भाजपला मात्र यामुळे सत्तेत महत्वाचा वाटा मिळण्याची दाट शक्यता आहे.