* नवीन चेहेऱ्यांना मिळणार संधी
* पाच वर्षांचे प्रगती पुस्तक तपासणार
ठाणे : भाजपमधील माजी नगरसेवकांचे पाच वर्षातील प्रगती पुस्तक तपासूनच त्यांना उमेदवारीचे तिकीट दिले जाणार असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग चढू लागला आहे. या आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गज माजी नगरसेवकांची अडचण निर्माण झाली असल्याने सर्वच पक्षात यामुळे स्पर्धा निर्माण होणार आहे. ठाणे महापालिकेच्या २०१७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपचे २४ नगरसेवक निवडणूक आले होते. ही संख्या अधिक वाढवण्याचा निश्चिय भाजपने केला असून यासाठी थेट शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात नाराज शिवसैनिकांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. याशिवाय राष्ट्रावादीचेही काही पदाधिकारी भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपचे जे माजी नगरसेवक आपल्याला पुन्हा तिकीट मिळेल या आशेवर असले तरी, या सर्व नगरसेवकांचा गेल्या पाच वर्षातील परफॉर्मन्स बघूनच त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. प्रभागांची तोडफोड झाल्याने कोणत्या नगरसेवकाच्या बाजूने किती जनमत आहे याची चाचपणी देखील केली जाणार असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
काही दिग्गज माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागात समाधानकारक कामे केली नसल्याचे उघड झाले आहे. याशिवाय काही नगरसेवकांना जनतेचा विश्वास देखील जिंकता आलेला नसून या निवडणुकीत भाजपला हा धोका पत्करायचा नसल्याने यामुळे दिग्गज नगरसेवकांचा पत्ता देखील कट होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नव्या चेहेऱ्यांना मिळणार संधी
भाजपमध्ये काही प्रमाणात परिवर्तन करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला असून यामध्ये त्याच-त्याच लोकांना संधी देण्यापेक्षा नव्या आणि विशेष करून तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यासाठी पक्षाकडून शोध मोहीम देखील सुरु करण्यात आली आहे. इतर पक्षातील महत्वाचे पदाधिकारी पक्षात कसे येतील यावरच पक्षाकडून कोणाला कशी संधी मिळणार आहे हे स्पष्ट होणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.