भाजप काढणार घर बचाव मोर्चा

ठाणे :- शहरात एकीकडे कर आकारणी करण्याची मोहीम जोमाने सुरु असताना दुसरीकडे प्रभाग क्रमांक ११ मध्ये मात्र योग्य कागदपत्रे असताना देखील कर आकारणी केली जात नसल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केला आहे. याबाबत सत्ताधारी पक्षाच्या धोरणावर देखील त्यांनी टीका केली आहे. हा सर्व प्रकार जाणीवपूर्वक होत असून याबाबत पालिका प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा नागरिकांसह ठाणे महापालिकेवर घर बचाव मोर्चा काढण्याचा इशारा पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

ठाण्यातील नागरिकांच्या घरांना मालमत्ता कर आकारणी करण्या संदर्भात महासभेत निर्णय झालेला असताना आणि या निर्णयाची अंमलबजावणी ठाण्याच्या किसननगर, राबोडी, लोकमान्यनगर, मुंब्रा, दिवा, पाडा नंबर 3, चैतीनगर, राबोडी  क्रांती नगर या भागात केली जात असताना प्रभाग क्रमांक 11 मधील गोकुळनगर, मुक्ताई नगर, मिलिंद नगर, गोकुलदास वाडी, गोपाळ बाग, आझाद नगर 1 , आझाद नगर 2 या भागातील संबंधित योजनेतील हजारो घरांना मालमत्ता कर आकारणी का नाही? असा सवाल नगरसेवक कृष्णा पाटील व नगरसेविका नंदा पाटील यांनी उपस्थित केला आहे. डिसेंबर २०२० पर्यंतच्या सर्व घरांना मालमत्ता कर आकारणी करण्यासंदर्भात ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर आहे. कर आकारणी संदर्भात नगरसेवक राम रेपाळे, नारायण पवार, शैलेश पाटील, रमाकांत मढवी, हनुमंत जगदाळे व कृष्णा पाटील, नगरसेविका मीनल संख्ये व नंदा पाटील यांनी चर्चा केली होती. त्यानुसार सर्व प्रभाग समितीमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षण व स्ट्रक्चर ऑडिट करुन घरांना कर आकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. अशीच प्रक्रिया प्रभाग 11 मध्ये करावी अशी मागणी कृष्णा पाटील यांनी केली आहे. प्रशासनाने येत्या आठ दिवसात याबाबत कार्यवाही न केल्यास महापालिकेवर घर बचाव मोर्चा काढण्यात येईल असा इशारा नगरसेवक कृष्णा पाटील व नगरसेविका नंदा पाटील यांनी दिला आहे.