सभापतीपदी भाजपाचे सचिन पाटील
भिवंडी: भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सभापतीपदी भाजपाचे सचिन बाळाराम पाटील यांची, तर उपसभापतीपदी शिवसेनेचे मनिष वसंत म्हात्रे यांची आज निवड झाली आहे.
केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील आणि श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांच्या यशस्वी रणनीतीतून भिवंडी बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. या निवडणुकीसाठी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे, भाजपाचे विजयानंद पाटील, श्रीकांत गायकर, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, अशोक साप्ते यांनी मेहनत घेतली.
भिवंडी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीत नवनवीन प्रयोगासाठी व दुग्धपालनासाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच कृषीमालाला मुंबई-ठाण्यात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली आहे. तर प्रकाश पाटील व विवेक पंडित यांनी अभिनंदन करून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कार्य करण्याची सूचना केली आहे.