शहापूर बाजार समितीवर भाजपा-शिवसेनेचा झेंडा

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या रणनितीला यश

शहापूर: शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर (एपीएमसी) भाजपा-शिवसेना युतीचा झेंडा फडकला आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या रणनितीमुळे दोन अपक्षांनी भाजपा-शिवसेना युतीला समर्थन दिल्यामुळे, सभापतीपदी भाजपाचे नंदलाल डोहळे यांची निवड झाली. तर उपसभापती शिवसेनेचे शरद वेखंडे यांची निवड झाली.

भाजपा-शिवसेना युतीला १० मते मिळाली. तर महाविकास आघाडीला सात मतांवर समाधान मानावे लागले.
शहापूर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला आठ व महाविकास आघाडीला आठ जागा मिळाल्या होत्या. तर दोन जागांवर अपक्ष निवडून आले होते. त्यामुळे सत्ता कोणाला मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सूकता होती. मात्र, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या रणनितीमुळे दोन्ही अपक्षांनी भाजपा-शिवसेना युतीला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपा-शिवसेना युतीचा बाजार समितीवर झेंडा फडकण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

आज झालेल्या निवडणुकीत भाजपाचे नंदलाल डोहळे यांची सभापतीपदी व शिवसेनेचे शरद वेखंडे यांची उपसभापतीपदी निवड झाली. या निवडणुकीत युतीच्या यशासाठी शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, अशोक इरनक, शेखर अधिकारी, सुभाष हरड, शहराध्यक्ष विवेक नार्वेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नंदकुमार मोगरे यांनी मेहनत घेतली.