कर्नाटक निवडणुकीनंतर भाजपाला रिसेटचे बटण दाबावे लागेल असे दिसते. विकासाचे एंटर बटण दाबून 2014 मध्ये बहुसंख्य मतदारांची मते डाऊनलोड झाली पण मग कोणीतरी विकासाचे बटण डिलीटच्या जागेवर हलवले की काय अशी शंका येऊ लागली. संगणक बंद करताना रिस्टार्टचा पर्यायही पुढे येत असतो. संगणक हँग होऊ लागले की रिस्टार्टच्या बटणच्या मदतीने हिंदुत्वाचा प्रोग्राम सुरू करून डाउनलोड प्रक्रिया सुरू होत असे. कर्नाटकच्या निवडणुकीनंतर 2014 च्या संगणक प्रणालीत 2019 मध्ये यश मिळवताना त्यातील काही दोष आढळून आले होते. त्यावर खरे तर दोन वर्षांपूर्वीच काम सुरू व्हायला हवे होते, परंतु ते आता सुरू करण्याचा विचार युद्धपातळीवर सुरू झाला आहे. 1 जानेवारी 2000 रोजी संपूर्ण संगणक विश्वाला भेडसावणाऱ्या वायटूके समस्येचे स्मरण या निमित्ताने होते.
कर्नाटक राज्याच्या निवडणुकांचे विश्लेषण राजकीय निरीक्षक अजुन काही दिवस करीत राहतील. त्यापैकी काही मंडळी नरेंद्र मोदींवर खापर फोडतील तर काहीजण राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ ला श्रेय देऊन त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करतील! शेवटी राजकीय निरीक्षक मंडळी हाडामासाची माणसे असतात. त्यांचे विश्लेषण ते प्रामाणिकपणे करीत असले तरी त्यांचे राजकीय विचारांचे प्रवाह त्यात डोकाऊ शकतात. तूर्तास त्यांना संशयाचा फायदा देताना एक गणित जे या निवडणुकीत उलगडले ते मांडावे लागेल. काँग्रेसला मिळालेले घवघवीत यश आणि भाजपाचा दारुण पराभव एवढाच या निकालाचा अर्थ काढता येणार नाही. भाजपाला 2018 मध्ये 36 टक्के मते मिळाली होती ती तेवढीच या खेपेस राहिली आहेत. काँग्रेसची मते 38 वरून 43 टक्के झाली परंतु भाजपाच्या जागा 104 वरून 66 पर्यंत खाली आल्या आणि काँग्रेसच्या जागा 78 वरून 135 झाल्या. जनता दल (एस) 18 टक्क्यांवरून तेरा टक्क्यांपर्यंत खाली आल्या. त्याचा लाभ काँग्रेसला झाला असेल तर जद (एस) ने 18 जागाच गमावल्या. पण काँग्रेसच्या वाट्याला वाढीव ६० जागा कोठून आल्या? या 60 जागांमध्ये स्थानिक काँग्रेस नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मेहनत आहे. भाजपाप्रमाणे बुजुर्ग नेत्यांचे रोड शो त्यांनी केले नाहीत, मोदींवर अति अवलंबून राहणे भाजपाला महाग पडले. त्यामुळे पराभवाचे बिल मोदींवर फाडण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली. प्रत्यक्षात मतदानाचा टक्का तेवढाच परंतु जागा कमी झाल्याने भाजपाला कर्नाटकच्या जनतेने नाकारले हा निष्कर्ष काढणे योग्य होईल काय सवाल भाजपाचे खंदे समर्थक विचारू शकतील.
विकासाच्या मुद्द्यापासून भाजपाने फारकत घेतली आहे का, असा प्रचाराचा एकूण रोख असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले. जाती-धर्माच्या व्होट बँक या खेपेस भाजपाचे हिंदुत्व मतदारांनी नाकारल्याचे दिसते. अल्पसंख्यांक मतांचे ध्रुवीकरण आणि त्यांनी एकगठ्ठा काँग्रेसच्या पारड्यात मते टाकणे हा मुद्दा ठळक वैशिष्ट्य ठरतो. भाजपाच्या नेतृत्वाचे अनेक अंदाज धुळीस मिळाले. विद्यमान आमदारांपैकी अनेकांना घाऊक उमेदवारी नाकारल्याचा परिणाम दिसतो. हे धाडस अनाकलनीय होते की फाजील आत्मविश्वासातून या चुका घडल्या हे चिंतन शिबिरात स्पष्ट होईल परंतु भाजपाला आपला संगणक ‘फॉरमॅट’ करून त्यावर पुन्हा नव्याने निवडणूक ‘फॉर्म्युले’ लोड करावे लागतील, असे दिसते. त्यासाठी काही ‘डेटा’ डिलीट करावा लागेल आणि 40% ‘करप्ट’ झालेली ‘हार्डडिस्क’ बदलावी लागेल. अनेक दिवसांनी काँग्रेस तसेच विरोधी पक्षांना विजयाचा गंध अनुभवायला मिळाला आहे, त्यामुळे तिसऱ्या आघाडीचे डोळे दक्षिणेकडून उगवलेल्या सूर्याकडे लागले नसतील तर नवल नाही.
भाजपा हाय कमांडने कर्नाटक निकालाची गंभीर दखल घेतल्याचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पुण्यातील भाषणावरून स्पष्ट जाणवते. कार्यकर्ते आणि नेते मंडळींनी उर्मटपणा सोडून सामान्य जनतेच्या भावना लक्षात घ्याव्यात असे ते म्हणाले. संगणकात कितीही अद्ययावत ‘प्रोग्राम’ असले तरी ‘पॉवर’ शिवाय तो चालत नसतो. ही पॉवर मतदारांच्या हाती असते. त्यांच्या मनात आले तर ते कोणाचा कधीही ‘फ्युज’ काढू शकतात! आत्मसंतुष्टतेच्या अनावश्यक फायली काढून ‘स्वच्छ भारत अभियान’ कार्यक्रम हाती घ्यावा लागेल.