ठाण्याच्या भाजप आमदारांनी घेतली मुंबईतील झोपु प्राधिकरणाची झाडाझडती

ठाणे : ठाणे शहरातील रखडलेले अनेक झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प सुरू करण्यासाठी तसेच झोपडपट्टी पुर्नविकास योजना राबवणाऱ्या विकासकांच्या मुजोरीला वेसण घालण्यासाठी ठाणे शहर भाजप स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी कंबर कसली आहे.

या पार्श्वभूमीवर बुधवारी ( ता.२७ एप्रिल) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात बैठक घेतली. शहरातील झोपडीवासियांच्या विविध समस्यांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर,अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवुन रहिवाश्यांवरील अन्याय दूर करण्याबाबत संबधित विकासकांना निर्देश दिले.

ठाण्यातील गांधींनगर भागातील भैरवनाथ नामक चार गृहनिर्माण सोसायट्यांच्या झोपडपट्टी पुर्नविकास योजना विकासकाच्या मनमानीमुळे रखडल्याच्या तक्रारी रहिवाश्यांनी केल्या होत्या. यासंदर्भात आ.निरंजन डावखरे,आ.संजय केळकर व स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ आदींनी वारंवार पाठपुरावा करूनही विकासकाकडून अडवणुक सुरुच असल्याने बुधवारी याप्रश्नी दोन्ही भाजप आमदारांनी स्थानिक रहिवाशी व भाजप स्लम सेलच्या शिष्टमंडळासमवेत मुंबईतील झोपु प्राधिकरणाच्या मुख कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली.

बैठकीला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे याच्यासमवेत अन्य अधिकारीही उपस्थित होते. त्याचबरोबर,भाजप स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ, माजी नगरसेवक भरत चव्हाण, शेरबहादुर सिंह, भाजप पोखरण मंडल अध्यक्ष संतोष जायसवाल, ठाणे भाजप उपाध्यक्ष रमेश आंब्रे, ओमकार चव्हाण, समाजसेविका कौशल्या गौड, ॲड. अशोक नलवाला, गांधीनगर रहिवाशी संघाचे अध्यक्ष अर्जुन मंगा, गंगाधर माळी, स्लम सेल मंडल अध्यक्ष भारती सावंत, निलेश भुजबळ, पिंकी ताई आदींसह रहिवाशी उपस्थित होते.

बैठकीमध्ये गांधी नगरमधील भैरवनाथ या चार सोसायटीच्या नियोजित प्रकल्पातील स्थानिक रहिवाश्यांच्या मागणीनुसार बायोमॅट्रिक सर्वे करण्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर येत्या १५ दिवसात नवीन प्रशासकीय अधिकारीही नेमण्यात येणार असुन आगामी तीन महिन्यात तेथील नवीन कार्यकारिणी मंडळ स्थापन करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.

कोपरीतील मित्रधाम व समन्वय सोसायटीसह पारशीवाडी रहिवाश्यांना दिलासा

ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील मित्रधाम आणि समन्वय सोसायटीचे लाभार्थी रहिवासी व स्थानिक लोकप्रतिनिधि याच्यासोबत झोपु अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.सदर बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी विकासकाला भाडे देण्याचे आदेश दिले.त्याचबरोबर विक्री इमारत आणि स्लम इमारतींचे समान दिशेने बांधकाम करण्याचे आदेश देण्यात आले.दरम्यान, कोपरीतील पारशीवाडी येथील नंदिवर्धन विकासकाला LOI ची प्रत मिळाली आहे. या विषयावर श्री.लोखंडे यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यावर येथील झोपडीवासियांना क्लस्टर योजने समाविष्ट करणे बंधनकारक नसल्याचा निर्वाळा मुख्य अधिकाऱ्यांनी दिला.