अंबरनाथ पालिका प्रशासनावर भाजपा नाराज, पक्षपातीपणाचा आरोप

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेत विकासकामे करताना प्रशासनाकडून अन्याय आणि पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप भाजपने केला असून याबाबत योग्य दखल न घेतल्यास प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा भाजपा शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर यांनी दिला.

अंबरनाथ शहरात गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे , शहरात विकास कामे करताना भाजपा पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप शहराध्यक्ष माहूरकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठराविक पक्षाच्या नगरसेवकांना कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असून भाजपा नगरसेवकांना मात्र वंचित ठेवले जात असल्याचा आरोप श्री. माहूरकर यांनी केला आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना लोकार्पण सोहळ्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप देखील यावेळी केला.

राज्यात शिवसेना आणि भाजपाची सत्ता असताना देखील अंबरनाथमध्ये भाजपच्या नगरसेवकांना सापत्न वागणूक दिली जाते असे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आदक आणि शहर अध्यक्ष माहुरकर यांनी आरोप केला आहे. शहरातील नगरसेवकांवर आणि पदाधिकाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाची माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे. अंबरनाथ नगरपालिकेत मुख्याधिकारी नागरिकांसाठी उपलब्ध होत नाहीत आणि ते कधीही पालिका कार्यालयात हजर राहत नाही त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेसाठी स्वतंत्र आणि पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळावा, अशी मागणी वरिष्ठांकडे केल्याचे माजी नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे.

शहरात घंटागाडी येत नाहीत किंवा योग्य प्रकारे कचरा उचलला जात नाही, अनधिकृत डंपिंग ग्राऊन्डवर कचरा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बेकायदा डम्पिंग ग्राऊन्डवर कचरा टाकणे बंद करावा, अन्यथा पालिका कार्यालयासमोर कचरा फेकला जाईल, असा इशारा शहराध्यक्ष माहूरकर आणि श्री. आदक यांनी दिला.

यासंदर्भात शहराध्यक्ष माहूरकर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने पालिका अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

महिला शहराध्यक्ष सुजाता भोईर , माजी नगरसेविका अनिता आदक, वंदना पाटील, अशोक गुंजाळ, दत्ता डावरे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान सर्कस ग्राउंडजवळ असलेल्या ठिकाणी कचरा टाकणे बंद केले असून यापुढे कचरा डंपिंग ग्राऊंडवरच टाकला जाईल असे पालिका सूत्रांनी सांगितले.