वाढदिवस होणार दमदार; ठाण्यात उपक्रम मुसळधार

डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहनिर्माण व अल्पसंख्यांक मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे-पालघर समन्वयक तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येत्या ५ ऑगस्ट रोजी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे कार्यकर्त्यांनी ठरविले आहे. त्यानुसार पाच ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १ या वेळेत गडकरी रंगायतन येथे १० वी आणि १२ वीमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी ७० ते ९० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांमधून लकी ड्राॅ काढून दोघांना टॅब तर ९० ते १०० टक्के गुण मिळवून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमधून लकी ड्रॉ काढून एक लॅपटॉप बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच, यावेळी करियर मार्गदर्शन शिबिरही आयोजित करण्यात आले आहे, यावेळी वेलिंगकर काॅलेजचे प्रा. अजित जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत असे आनंद परांजपे यांनी सांगितले.

दरम्यान, डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ५ व ६ ऑगस्ट रोजी कौसा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तहसील कार्यालयामार्फत देण्यात येणारे विविध दाखले ऑन दि स्पॉट देण्यात येणार आहेत. तसेच परिवहन सदस्य शमीम खान यांच्यावतीने दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे, असेही परांजपे यांनी सांगितले.

आयुक्तांना प्रशासकीय सेवेचा विसर

माजी महापौर नरेश म्हस्के हे ठाणे महानगर पालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवींसोबत पत्रकारांना संबोधित करीत होते. याबाबत विचारले असता, आनंद परांजपे म्हणाले की, ठामपा आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांना आपल्या प्रशासकीय कर्तव्यांची आठवणच राहिलेली नाही. महासभेची मुदत ९ मार्चला संपलेली आहे. त्यामुळे ठामपातील १३१ नगरसेवक हे सामान्य ठाणेकर झालेले आहेत. कोणी महापौर नाही, कोणी उपमहापौर नाही, कोणी स्थायी समिती सभापती नाही किंवा कोणीही सभागृह नेता नाही; ही पदे आता अस्तित्वात नाहीत. त्यामुळे डाॅ. विपीन शर्मा हे स्वतः पालिकेचे प्रशासक आहेत. त्यांनी जरूर ठाणे शहराचे दौरे करावेत; विकासकामांची माहिती प्रसारमाध्यांमातून ठाणेकरांना द्यावी. पण, ज्या महासभेचे अस्तित्व संपलेले आहे; अशा महापौरांना सोबत घेऊन आयुक्त सातत्याने कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. त्याबाबतची लेखी तक्रार मुख्य सचिवांकडे आपण करणार आहोत. शिवाय, माझी आयुक्तांना विनंती आहे की कायदा तोडणारे आयुक्त असे चित्र ठाणेकरांसमोर उभे करू नका.

राष्ट्रवादीचे नगरसेवक शिंदेगटात प्रवेश करणार आहेत, असे विधान म्हस्के यांनी केले होते, याबाबत विचारले असता, नरेश म्हस्के यांचा स्वतःचा इतिहास तपासून घ्या. आपणाला त्यावर अधिक बोलायचे नाही. ज्यांनी स्वतः वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. अन् शिवसेनेचा वेगळा शिंदे गटाची ज्यांनी स्थापना केली. त्यांचा पुढाकार आपण ठाणेकरांनी पाहिलेला आहे. त्यावर न बोललेले बरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली खंबीर आणि भक्कम आहे. त्याची प्रचिती कालच आली आहे, राज्यपाल कोश्यारींविरोधात केलेल्या आंदोलनानंतर कोश्यारी यांना माफी मागावी लागली आहे. त्यामुळे म्हस्के यांनी स्वतःला तपासावे. राष्ट्रवादी येथे सक्षम आहे, असा टोला परांजपे यांनी लगावला.