दोन माजी नगरसेविकांमध्ये हमरी-तुमरी
ठाणे: शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता फाटक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात लावण्यात आलेले बॅनर फाडण्यात आले असून एका बॅनरवर काळी शाई टाकण्यात आली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी नम्रता फाटक आणि नम्रता भोसले यांच्यात हमरी-तुमरी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधील शिवसेनेच्या नगरसेविका नम्रता फाटक यांच्या वाढदिवसाचे बॅनर लुईसवाडी तसेच तीन हात नाका येथील सुर्वेवाडी या ठिकाणी लावण्यात आले होते. या बॅनरवर नम्रता फाटक यांच्यासह, बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आनंद दिघे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो देखील लावण्यात आले होते. मात्र रात्री उशिरा लुईसवाडी येथील बॅनर फाडण्यात आला. दुसरीकडे तीन हात नाका येथील सुर्वेवाडी या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवरही शाई टाकण्यात आली. हा प्रकार स्थानिक शिवसैनिकांच्या लक्षात आला.
ही माहिती कळताच माजी नगरसेविका मीनल संख्ये, नम्रता फाटक, राजेंद्र फाटक, माजी नगरसेवक दीपक वेतकर यांच्यासह काही शिवसैनिक तसेच पोलीस देखील या ठिकाणी पोचले. यावेळी संतप्त झालेल्या मीनल संख्ये यांनी असा प्रकार कदापी सहन करणार नसल्याचे सांगितले. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी दुपारी शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले आणि नम्रता फाटक या दोन्ही नगरसेविकांमध्ये झटापट झाल्याचा प्रकार घडला. दोघींनी एकमेकांना शिवीगाळ देखील केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या वादाची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत गेली असून एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे महत्वाचे ठरणार आहे. सौंदर्यीकरणाच्या कामांवरून हा वाद झाला आहे.
नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी शहर सौंदर्यीकरणाचे काम आधीच सुरू करण्यात आले होते. पुन्हा या ठिकाणी प्लांटेशनमुळे अडथळा येणार असल्याने या ठिकाणी काम करू नये अशी विनंती केली आहे, असे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी सांगितले.