शहापुरात बर्ड फ्ल्यू; ३०० कोंबड्या दगावल्या

१५ हजार कोंबड्यांवर येणार संक्रात

शहापूर : शहापूर तालुक्यात ‘बर्ड फ्लू’ने डोके वर काढले असून वासिंद परिसरातील वेहलोळी येथे ३०० कोंबड्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली. या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. यापूर्वीही या भागातील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली होती. घटनास्थळी कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याचे काम पथकाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास महसूल प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती विभाग यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित सुरू असून परिसरातील सहा पोल्ट्री व्यावसायिकांच्या पोल्ट्रीमधील पक्ष्यांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे हजारो पक्ष्यांची विल्हेवाट लावतांना संबंधित पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळावी याची मागणी त्यांनी केली असून शासन स्तरावरुन किती नुकसान भरपाई मिळते याकडे या पोल्ट्री व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. या परिसराव्यतिरिक्त इतर कुठेही अशी बाब निदर्शनास आली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

या परिसरातील ३०० कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. एक ते दीड किलोमीटरच्या आत अंदाजे १५ हजार पक्षी असण्याची शक्यता असून तेवढे पक्षी नष्ट करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शन दळवी यांनी दिली.

बर्ड फ्ल्यू संसर्ग रोखण्यासाठी अधिसूचना जारी

या संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून बर्ड फ्लूचा संसर्ग जिल्ह्यात इतरत्र कुठेही पसरु नये यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बर्ड फ्लू बाधित क्षेत्र केंद्रबिंदू मानून एक कि.मी. त्रिज्येतील परिसर संसर्ग क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्राातील पोल्ट्री फार्ममधील कुक्कुट पक्षी, उर्वरित पक्षी खाद्य, अंडी नष्ट करुन त्याची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या भागातील कुक्कुट पक्षांचे जिल्हा पशुसंधर्वन उपायुक्त यांच्या मार्फत शिघ्रकृती दलाच्या माध्यमातून शास्त्रोक्त पध्दतीने प्रभावीत पक्षांना नष्ट करण्याची प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जोपर्यंत बाधित क्षेत्र संपूर्णत: संसर्गमुक्त क्षेत्र म्हणून घोषित होत नाही, तोपर्यंत या एक कि.मी. त्रिज्येतील चिकन विक्रेते व वाहतूकदार यांचे दैनंदिन कामकाज रोखण्यात यावे, असे निर्देश अधिसूचनेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

वेहळोली वगळता जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची घटना नाही. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.