ठाणेवैभव क्रिकेट करंडक
ठाणे: ठाणेवैभव क्रिकेट करंडक आंतरकार्यालयीन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत बिनेट कम्युनिकेशनने सिएट संघाला नमविले.
सेंट्रल मैदानात झालेल्या या सामन्यात सिएट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उत्कर्ष हजारे याने सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५८ धावा फटकावल्या. तर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या प्रकाश पाटील आणि अक्षय जाधव यांनी अनुक्रमे ३६ आणि ३२ धावा केल्या. मात्र अन्य फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. बिनेट कम्युनिकेशनच्या सिद्धार्थ नरसुमैया, अन्वय शिदये, प्रथमेश बेलचडा आणि सागर मुळ्ये यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. ३४ षटकांत सिएट संघाने सर्व गडी गमावून १९५ धावांचे आव्हान बिनेट कम्युनिकेशनला दिले.
सिएट संघाचे आव्हान पेलताना बिनेट कम्युनिकेशनने दीपक भोगले यांच्या दमदार शतकाच्या जोरावर फक्त चार गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केले. दीपक भोगले याने १३ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद १०६ धावा फटकावल्या. तर प्रथमेश बेलचडा याच्या ३६ धावा आणि अभिनव जगताप याच्या २६ धावांनी विजयात योगदान दिले. बिनेट कम्युनिकेशनने २७.१ षटकांत चार गडी गमावून १९६ धावा केल्या.