कोट्यवधींची बिले थकली; तिजोरीचे दार उघडा

राज्य सरकारी कंत्राटदार आणि कामगारांचा मोर्चा

ठाणे: राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या विविध पायाभूत कामांची पूर्तता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे सदस्य असलेल्या ठेकेदारांनी केली आहे. मात्र, त्यांची देयके देण्यात चालढकल करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे विभागिय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी प्रतिकात्मक तिजोरी आणली होती. अर्थमंत्री अजितदादा पवार, या तिजोरीचे दार उघडा, अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते.

राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, जलजीवन मिशन विभाग, ग्रामविकास व जलसंधारणसारख्या अनेक शासनाच्या विभागाकडे काम करणाऱ्या कंत्राटदार यांची अनेक प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी शासन, मंत्री व प्रशासनाकडून शासन स्तरावर काहीही प्रयत्न होत नाही. याबाबत शासनास कंत्राटदार महासंघाने वेळोवेळी पाच मागण्यांचा ड्राफ्ट दिला होता. पत्रव्यवहार व बैठकही घेतली होते, परंतु शासन काहीही करीत नाही, असा आरोप करून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने सार्वजनिक बांधकाम कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला होता. मोर्चेकऱ्यांनी वाटेत येत असलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजीमहाराज आणि बाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

दरम्यान, राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम विकास जलजीवन मिशन, जलसंधारण, स्थानिक स्वराज्य संस्था इथे विकास कामे करणाऱ्या कंत्राटदार यांची देयके तातडीने देऊन कंत्राटदार त्यांचे कुटुंब व त्यावर अवलंबून असणारे व्यवसायिक यांची वर्षानुवर्षे देयकेच मिळत नसल्याने होणारी आर्थिक पिळवणूक व उपासमार तातडीने बंद करावी; राज्यातील सर्व विभागाकडील कामे मंजुरी करण्याच्या अगोदर त्या कामांना निधीची उपलब्धता असल्याशिवाय शासनाने सदर कामांसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया अजिबात राबविण्यात येऊ नये, आदी मागण्यांचे निवेदन महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला दिले.

या प्रसंगी मंगेश आवळे यांनी, मागील दोन वर्षांपासून राज्यातील सर्व कंत्राटदार मेटाकुटीला आले आहेत. अनेकदा निवेदने, निदर्शने केली आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही कंत्राटदारांनी मागणी केली होती. त्यावेळेस आम्हाला आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. आता देवेंद्र फडणवीस यांनी तरी लक्ष द्यावे. पंतप्रधान मोदी हे देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रीलियन करण्याचे स्वप्न बघत आहेत. मात्र, त्यासाठी ठेकेदारांची बिले अदा करणे गरजेचे आहे. कारण, ही बिले अदा केली औरच ठेकेदारांकडून कररूपात एकूण देयकापैकी 22टक्के रक्कम सरकारला देण्यात येत असते. हीच रक्कम देशाच्या पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेस पोषक ठरणार आहे. त्यामुळेच अजित पवार यांनी आता तरी तिजोरीचे दार उघडावे, अशी मागणी केली.

यावेळी या आंदोलन मध्ये संघटनेचे अनिल नलावडे, अतुल घरत, शेखर नितवाने, कल्पेश केणे संतोष जयकर, दर्शना शिंदे, वसंत फुलवर, विशाल गायकवाड बाळकृष्ण ठाकरे, सनी लाड मोहिते, चेतन शिंदे, तिवरेकर, राजू शेठ आदी पदाधिकारी उपस्थित होते.