ठाणे : भंडार्लीमध्ये ज्या खासगी जागेसाठी ठाणे महापालिका केवळ एका वर्षांसाठी तब्बल अडीच कोटींपेक्षा अधिक रक्कम मोजणार आहे त्याच भंडार्लीमध्ये शासनाच्या नगरविकास खात्याच्या मालकीची देखील जमीन आहे. ठाणे महापालिकेकडून या जागेचा पर्याय का शोधण्यात आला नाही याबाबत मात्र उलटसुलट चर्चा आता सुरु झाली आहे.
ठाणे महापालिका आणि भंडार्ली येथील खासगी जागा मालकासोबत करार करण्यात आला असल्याचा दावा देखील पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. सुरुवातीला जागा ताबा घेण्याचा आणि त्यापोटी अदा करण्यात येणारे भाडे यासंदर्भातील प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी आणण्यात आला होता. पूर्वीच्या प्रस्तावाप्रमाणे हा भाडे करार १० वर्षाचा करण्याचे प्रस्तावित केले होते तर त्यापोटी ठाणे महापालिकेला ९२ कोटींचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार होता. मात्र हा प्रस्ताव बदलण्यात आला असून तो केवळ एकाच वर्षाचा करण्यात आला असून यापोटी ठाणे महापालिकेला खाजगी जागा मालकाला अडीच कोटींपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.
जागा मालक आणि ठाणे महापालिकेत एका वर्षाचा करार करण्यात आला असून यामध्ये जागा मालकाला प्रत्येक महिन्याला २० लाख रुपये भाड्यापोटी अदा करावे लागणार आहे.त्यामुळे ठाणे महापालिकेवर वार्षिक अडीच कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे. दुसरीकडे डम्पिंगसाठी लागणाऱ्या अनुषंगिक कामांसाठी ३ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. रेडीरेकनरचे दर हे प्रत्येक वर्षी बदलत असतात. हे रेट कमी किंवा जास्त होऊ शकतात, ही शक्यता लक्षात घेऊन केवळ एकाच वर्षाचा करारनामा करण्यात आला असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. एकीकडे खाजगी जागेसाठी कोट्यवधींची रक्कम ठाणे महापालिकेला मोजावी लागणार असल्याने दुसरीकडे भांडर्लीमध्येच १०० मीटर अंतरावर नगरविकास खात्याची मालकीची १२ एकर जमिन असताना या जागेचा पर्याय ठाणे महापालिकेने का शोधला नाही असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.