ठाणे: ठाणे जिल्ह्यात रस्त्यारस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य दिसत असून या खड्ड्यांमुळे कल्याण-शिळ मार्गावर पहिला बळी गेला आहे. या अपघातात सागर मिसाळ (२२) या दुचाकीस्वाराचा नाहक बळी गेला आहे. त्यामुळे आतातरी प्रशासनाला जाग येणार का असा सवाल वाहनचालकांनी केला आहे.
सागर मिसाळ हा बुधवारी रात्री २च्या सुमारास नवी मुंबईच्या दिशेने दुचाकीवरून जात होता. तो कल्याण-शिळ मार्गावरील मातेश्वरी अल्ट्रा गृहसंकुल परिसरात आला असता एका भल्यामोठ्या खड्ड्यात त्याची दुचाकी गेली आणि त्याचा गाडीवरुन तोल गेला. त्याचवेळी मागून येणाऱ्या एका कारने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला मार लागला तसेच अंतर्गत जखमा झाल्या. त्याला उपचारासाठी देसाई गाव भागातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सागर यांच्या नातेवाईकांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्याच्या मामांनी याप्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या घटनेनंतर आता रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.