आ.प्रताप सरनाईक फाऊंडेशनमार्फत सर्वात मोठी घरगुती सजावट स्पर्धा

Thanevaibhav Online

16 September 2023

ओवळा-माजिवडा क्षेत्रात नऊ लाखांची बक्षिसे

ठाणे: शिवसेना ओवळा-माजिवडा विधानसभा आणि आमदार प्रताप सरनाईक फाऊंडेशनतर्फे यंदा ठाणे शहरातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठाणे शहरातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाचे ७५ शाखाप्रमुख असून प्रत्येक शाखाप्रमुखाच्या कार्यक्षेत्रात घरगुती श्री गणेश सजावट स्पर्धा होणार आहे. यात शहरात एकूण नऊ लाखांची बक्षिसे या स्पर्धेत विजेत्यांना दिली जाणार आहेत.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १८ सप्टेंबर, २०२३ पर्यंत नाव नोंदणी जवळच्या शिवसेना शाखेत किंवा शाखाप्रमुखाकडे करता येईल किंवा आमदार प्रताप सरनाईक यांचे जनसंपर्क कार्यालय, वर्तकनगर येथेही फॉर्म उपलब्ध होतील.

प्रत्येक शाखाप्रमुखाच्या कार्य क्षेत्रात एकूण ११ हजारांची बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिले बक्षीस पाच हजार रुपये रोख, दुसरे बक्षीस तीन हजार रुपये रोख, तिसरे बक्षीस दोन हजार रुपये रोख, उत्तेजनार्थ एक हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येईल.

ही स्पर्धा फक्त ठाणे शहरातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील भक्तांसाठी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकांनी काढलेले फोटो हे कोणत्याही शाखेमध्ये स्वीकारले जाणार नाहीत. स्पर्धेत प्रवेश विनामूल्य आहे. शाखाप्रमुख व त्याचे सहकारी नाव नोंदणी केलेल्या स्पर्धकांच्या घरी जाऊन सजावटीचे परीक्षण करतील आणि त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल.

पर्यावरणस्नेही वस्तूंपासून केलेल्या सजावटीला तसेच इको फ्रेंडली मूर्ती किंवा आकर्षक मूर्ती असल्यास त्यांची विशेष नोंद घेतली जाणार आहे. प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धेत आपल्या घरी गणपती बाप्पांची आरास व सजावट करणाऱ्या जास्तीत जास्त गणेश भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आमदार प्रताप सरनाईक यांचे जनसंपर्क कार्यालय, वर्तकनगर ०२२-२५४२७२१७ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.