‘आयपीएल’च्या महालिलावात ५९० खेळाडूंवर बोली

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी महालिलावासाठी दोन कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या अव्वल श्रेणीत सलामीवीर शिखर धवन, धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर आणि फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन या भारतीय खेळाडूंसह पॅट कमिन्स आणि कॅगिसो रबाडा या परदेशी वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.

बेंगळूरु येथे १२ आणि १३ फेब्रुवारीला होणाऱ्या या महालिलावात ५९० खेळाडूंवर बोली लागणार आहे. संघांनी खेळाडूंची पसंती दर्शवल्यानंतर गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेली १२१४ खेळाडूंची यादी कमी झाली.

मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, इशांत शर्मा आणि अजिंक्य रहाणे या भारताच्या अनुभवी खेळाडूंचाही दोन कोटी रुपये मूळ रकमेच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. या श्रेणीत एकूण ४८ खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय इशान किशन, देवदत्त पडिकल, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, गतहंगामात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज हर्षल पटेल, फिरकी गोलंदाज यजुर्वेद्र चहल आणि वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर या युवा भारतीय खेळाडूंवर लक्षवेधी बोली लागण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, अष्टपैलू मिचेल मार्श, अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ, बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसन, दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फॅफ डय़ुप्लेसिस या अव्वल श्रेणीतील परदेशी खेळाडूंवरही संघांचे लक्ष असेल. या श्रेणीत अनुभवी खेळाडू सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पाची निराशा होण्याची शक्यता आहे. दीड कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या दुसऱ्या श्रेणीत २० खेळाडूंचा आणि एक कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या तिसऱ्या श्रेणीत ३४ खेळाडूंचा समावेश आहे.

भारताच्या युवा (१९ वर्षांखालील) संघातील कर्णधार यश धूल, विकी ओस्टवाल आणि रवींद्र हंगर्गेकर यांच्यासह शाहरूख खान, दीपक हुडा आणि आवेश खान हे खेळाडू लिलावात छाप पाडतील, अशी आशा आहे.

दक्षिण आफ्रिकेचा ४२ वर्षीय फिरकी गोलंदाज इम्रान ताहीर हा लिलावातील सर्वात वयस्क खेळाडू आहे, तर अफगाणिस्तानचा नूर अहमद हा १७ वर्षीय खेळाडू सर्वात युवा खेळाडू आहे. नूर सध्या युवा विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे.

लिलावाचा लेखाजोखा

५९०  एकूण खेळाडू

३७०    भारतीय खेळाडू

२२०    परदेशी खेळाडू

२२८    आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

३५५    बिगरआंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

७      सहयोगी राष्ट्रांचे क्रिकेटपटू

४८     २ कोटी मूळ किंमतीचे खेळाडू

२०     १.५ कोटी मूळ किंमतीचे खेळाडू

३४     १ कोटी मूळ किंमतीचे खेळाडू

* पंजाब किंग्ज संघाच्या खात्यावर सर्वाधिक ७२ कोटी रुपये रक्कम शिल्लक आहे, तर दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वात कमी ४७.५ कोटी रुपये रक्कम आहे.

* पंजाब किंग्ज संघात सर्वाधिक २३ खेळाडूंच्या जागा रिक्त आहेत, तर चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या संघांमधील २१ खेळाडूंच्या जागा रिक्त आहेत. अन्य संघांच्या प्रत्येकी २२ जागा रिक्त आहेत.

* लिलावातील परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक ४७ खेळाडू आहेत, तर दुसरा क्रमांक ३४ खेळाडूंचा समावेश असलेल्या वेस्ट इंडिजचा लागतो. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचे ३३, श्रीलंकेचे २३, इंग्लंडचे २४, न्यूझीलंडचे २४ आणि अफगाणिस्तानचे १७ खेळाडू लिलावात आहेत.