ज्येष्ठांच्या जिभेच्या कर्करोगावर कमांडो शस्त्रक्रिया यशस्वी

सिव्हील रुग्णालयातील डॉक्टरांची कामगिरी

ठाणे: तंबाखू सेवनामुळे मौखिक कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो, तरीही अनेकजण गुटखा, तंबाखू आणि सिगारेटच्या आहारी जातात. कर्करोग झाल्यानंतर त्याचा परिणाम गंभीर स्वरूपाचा होतो आणि उपचारांचा खर्चही मोठा असतो. मात्र, सर्वसामान्य रुग्णांसाठी आधारवड ठरणाऱ्या ठाणे सिव्हील रुग्णालयात तंबाखू सेवनामुळे एका ज्येष्ठ नागरिकाला झालेल्या मौखिक कर्करोगावर जोखमीची कमांडो शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे.

ठाण्यात रहाणारे शांताराम जाधव (वय ७०, नाव बदलून) यांना गेल्या अनेक वर्षांपासून तंबाखू खाण्याची सवय होती. मात्र या तंबाखूने आपल्याला मौखिक कर्करोगाला सामोरे जावे लागेल याची पुसटशी कल्पनाही नव्हती. अचानक तोंडातली जीभ जाड झाल्याने बोलताना जेवताना त्रास जाणवू लागला. होणाऱ्या त्रासामुळे शांताराम हे उपचारा निमित्त ठाणे सिव्हील रुग्णालयात आले होते. यावेळी जिभेची बायोप्सी केली असता, जीभेचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावर जिभेची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम यांच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा दंतशल्य चिकीत्सक डॉ. अर्चना पवार यांनी दिली.

प्रथम शांताराम याच्या सर्व रक्तचाचण्या झाल्यावर, शारीरिक स्वास्थ्याची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली गेली. यावेळी शांताराम यांचा कर्करोग जिभेपासून मानेपर्यंत पसरला होता. त्यामुळे काहीशी जोखमीची शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑन्को सर्जन डॉ.हितेश सिंगवी यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. ही शस्त्रक्रिया दंत शल्य चिकित्सक डॉ. अर्चना पवार, भूल तज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, डॉ. सुजाता पाडेकर आदींनी यशस्वी केली.

गेल्या वर्षभरात ठाणे सिव्हील रुग्णालयात ही पाचवी यशस्वी कमांडो शस्त्रक्रिया पार पडली आहे. कमांडो शस्त्रक्रिया म्हणजेच “COMbined MAndibulectomy and Neck Dissection Operation”, ज्यामध्ये मुखाचा संसर्गित भाग आणि मानेतील गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकली जाते.

सिव्हील रुग्णालयातील दंत विभागात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना मौखिक कर्करोगाविषयी मार्गदर्शन केले जाते, अशी माहिती दंतशल्य चिकीत्सक डॉ. अर्चना पवार यांनी दिली.

आमच्या प्रयत्नांचा उद्देश रुग्णांना दर्जेदार उपचार सिव्हील रुग्णालयातच उपलब्ध करून देणे हा आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये कर्करोग उपचारांचे मोठे आर्थिक ओझे सर्वसामान्यांना झेलता येत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना मुंबईतील टाटा रुग्णालयात धाव घ्यावी लागते. मात्र, ठाणे सिव्हील रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मौखिक कर्करोगाच्या शस्त्रक्रिया केल्या जात असून रुग्णांना दिलासा मिळत आहे, असे डॉ.कैलास पवार यांनी सांगितले.