महात्मा ज्योतिबा फुले विचार प्रबोधन कट्टयाचे बुधवारी भूमिपूजन

ठाणे : आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती दिनाचे औचित्य साधून येत्या बुधवारी म्हणजेच 3 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता ठाणे कोर्टनाका सर्कल येथे महात्मा ज्योतिबा फुले-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंत डावखरे यांनी ठाण्यात फुलेंचे स्मारक असावे, अशी संकल्पना मांडली होती. ही संकल्पना पूर्णत्वास जावी, यासाठी ठाणे ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले यांनी ठाणे शहरात फुले दाम्पत्याचे स्मारक व्हावे, यासाठी पत्रव्यवहार केला होता. मागील वर्षी गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमात कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार तथा समन्वय प्रतिष्ठान अध्यक्ष अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी फुले स्मारकासाठी निधी देण्याची घोषणा केली होती. त्यांनी आपला शब्द खरा करुन निधी उपलब्ध करुन दिला. त्यांच्या विशेष निधीमधून या विचार कट्ट्याची उभारणी करण्यात येत आहे.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोर्टनाका सर्कल येथे या कट्ट्याचे भूमिपूजन कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार तथा समन्वय प्रतिष्ठान अध्यक्ष अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या विचार कट्ट्यावर फुले दाम्पत्याचे विचार आणि त्यांचे जीवनचरित्र यांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे. या सोहळ्यास तमाम ठाणेकर बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे, ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल वाघोले यांनी केली आहे.