अंबरनाथ : अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर सुशोभीकरणाचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येत्या 3 मार्च रोजी होणार आहे.
अंबरनाथचे पुरातन शिवमंदिराचे सुशोभीकरण संदर्भात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली. शिवमंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 150 कोटी रुपये मंजूर केले होते. या निधीमधून संपूर्ण मंदिर परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे,
3 मार्च रोजी भूमिपूजन झाल्यानंतर सुशोभीकरण कामाला गती येणार असून येत्या दोन ते तीन वर्षात सुशोभीकरण काम पूर्ण होईल, असा विश्वास खा. शिंदे यांनी व्यक्त केला.
पूर्ण काळ्या रंगाच्या पाषाण दगडाचा वापर करून मंदिर परिसरात प्रवेशद्वार कमान, जुने कुंड, घाटांचे सुशोभिकरण, भक्त निवास, अँम्पिथिएटर, भव्य प्रशस्त उद्यान, बस स्टॉप, मंदिराशेजारून वाहणाऱ्या वालधुनी नदीचे संवर्धन आदी कामांचा अंतर्भाव आहे. मंदिर परिसर सुशोभित झाल्यानंतर अंबरनाथला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढेल, मुख्यमंत्री शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार आदींच्या सहकार्यातून मंदिर परिसर सुशोभीकरणाला चालना मिळाल्याचे खा. शिंदे म्हणाले.
कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.