भाईंदर: महिलांच्या भोळेपणाचा फायदा उठवत आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना जाळ्यात ओढून वासनेची शिकार बनविणाऱ्या भोंदूबाबाला नयानगर पोलिसांनी ‘चांगलाच हात’दाखविला आहे.
जादू टोण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार करून तिची अश्लील छायाचित्रे काढणाऱ्या विनोद पंडित नावाच्या ढोंगी बाबाला नया नगर पोलिसांनी अटक केली आहे. हस्तरेखातज्ञ असल्याचा दावा करणाऱ्या या ढोंगी बाबा पंडितने अनेक महिलांना आपले शिकार बनवले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. फेसबुकवर जाहिरात करून महिलांना आपल्या जाळ्यामध्ये ओढत असलेल्या ‘बाबा’च्या कुंडली चा पंचनामा पोलिसांकडून सुरू आहे.
संतोष पोतदार उर्फ विनोद पंडित (५५) नावाच्या या ढोंगी बाबाने फेसबुकवर हस्तरेखा तज्ञ विनोद पंडित या नावाने पेज सुरू केले होते. मीरा रोडच्या शांतीनगर येथील मोहिनी अपार्टमेंटमध्ये त्याने आपले दुकान थाटले होते. काळी विद्या, जादूटोणा अवगत असल्याचा दावा त्याने केला होता. वैवाहिक अडचणी आणि विविध समस्या असल्यास पत्रिकेतील दोष दूर करून दिला जाईल असे या फेसबुक पेजवर त्याने म्हटले होते.
जोगेश्वरीत राहणाऱ्या एका महिलेला नोकरी लागत नव्हती. ती या बाबाची फेसबुक जाहिरात वाचून त्याच्याकडे गेली होती. बाबाने तिचा विश्वास संपादन केला आणि जादूटोणा तंत्र विधीच्या नावाखाली तिच्याशी बळजबरीने शरीरसंबंध बनवू लागला. नंतर या महिलेचे लग्न झाले. परंतु एका वर्षातच तिच्या लग्नातील वैवाहिक अडचणी आल्याने पुन्हा या बाबाची भेट घेतली. मात्र या बाबाने जादूटोणाच्या नावाखाली तिच्यावर नैसर्गिक तसेच अनैसर्गिक अत्याचार केला. या काळात बाबाने तिची अश्लील छायाचित्रे काढली होती. या छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून तो तिच्यावर तीन वर्षे अत्याचार करत होता.
अखेर कंटाळून महिलेने नया नगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३७६ (२) (एन), ३७७, ५०६ सह क्विझ माहिती तंत्रज्ञान अधिनियमच्या कलम ६७ (बी) तसेच महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा उच्चाटन अधिनियम २०१३ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.