हत्तीरोग दुरीकरणासाठी आजपासून सार्वत्रिक औषधोपचार मोहीम
ठाणे: ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने हत्तीरोग दुरीकरणासाठी उद्या मंगळवारपासून सार्वत्रिक औषधोपचार मोहीम प्रामुख्याने भिवंडी तालुक्यात राबविण्यात येत आहे.
राज्यातील सहा जिल्ह्यांतील १६ तालुक्यांमध्ये १० ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एम.डी.ए.) राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने भिवंडी तालुक्यात जनजागृतीसाठी मोबाईल आरोग्य जनजागृती व्हॅनचा वापर करण्यात येत आहे. या व्हॅनचे उद्घाटन व हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते करण्यात आला. ही मोहीम जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय, ठाणे व गोदरेज एम्बेड-एफएचआय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
भिवंडी तालुक्यातील एकूण पात्र लोकसंख्या पाच लाख ८७६५ इतकी असून स्थलांतरित पात्र लोकसंख्या दोन लाख ३२८४ इतकी आहे. यामध्ये वीटभट्ट्या, गोदामे, नवीन बांधकामे, कारखाने आदी ठिकाणी कार्यरत व्यक्तींचा समावेश आहे. अशा पद्धतीने एकत्रित सात लाख १२०४९ नागरिकांना औषधे देण्यात येणार आहेत. मोहिमेदरम्यान भिवंडी तालुक्यात डीईसी व अल्बेंडाझोल या दोन औषधांची एकत्रित मात्रा दिली जाणार असून औषधे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन दिली जातील. यासाठी ५३१ पथके तयार करण्यात आली आहेत. दोन वर्षांखालील मुले, गर्भवती महिला व गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना औषधे देण्यात येणार नाहीत. औषधे उपाशीपोटी घेऊ नयेत तसेच आशा सेविका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच सेवन करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही औषधे आतड्यातील जंतुसंसर्ग व त्वचारोगांवरही प्रभावी असून मुलांच्या शारीरिक व बौद्धिक विकासास सहाय्यभूत ठरतात.
या मोहिमेंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देऊन नागरिकांना हत्तीरोगविरोधी गोळ्या खाऊ घालणार आहेत. ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यामध्ये ही मोहीम जिल्हाधिकारी ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून तांत्रिक नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोषी शिंदे यांच्या अधिपत्याखाली करण्यात येत आहे.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोषी शिंदे, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती शिंदे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. बालाजी गावडे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी संजय जाधव, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.