मुंब्र्यातील उर्दू माध्यमातील दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठीचे धडे

ठाणे: आगामी इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मराठी विषयात अधिक आत्मविश्वास मिळावा, लेखन कौशल्य विकसित व्हावे तसेच भाषा सोपी आणि प्रभावीपणे समजावी या उद्देशाने मुंब्र्यात पहिल्यांदाच एम एस पी केअर फाऊंडेशन व नगरसेविका मर्जिया पठाण यांच्या वतीने खास मराठी विषय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दोन हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या मार्गदर्शन शिबिरामध्ये शकील इसाप, ज्ञानेश्वर चौधरी यांनी मराठी विषयातील पाठ्यक्रम समजावून सांगताना उत्तरलेखनाच्या योग्य पद्धती, निबंध, पत्रलेखन, व्याकरणातील महत्त्वाचे मुद्दे, गुण मिळवून देणारे प्रश्न कसे सोडवावेत, तसेच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या टिप्स विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबाबत असलेली भीती दूर करून त्यांना विषयात गती मिळावी, हा या शिबिराचा मुख्य हेतू होता.

मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी, परीक्षेतील वेळेचे नियोजन, लेखनातील नेमकेपणा आणि सादरीकरण यावर विशेष भर देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठी विषय अधिक सोपा, रंजक आणि गुण मिळवून देणारा वाटू लागल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात उत्तम यश मिळवण्यासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना पालक व विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शैक्षणिक गुणवत्तेला चालना देणाऱ्या या उपक्रमाबद्दल नगरसेविका मर्जिया पठाण यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे