भिवंडी ग्रामीण परिसराचा कायापालट होणार

कपिल पाटील यांच्या हस्ते कोट्यवधींच्या विकासकामांची उद्घाटने

भिवंडी : केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांतून भिवंडी ग्रामीण भागातील गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. रस्ते, शाळा व अंगणवाडीची इमारत, पाणीपुरवठा योजना, तलाव सुशोभिकरण, प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आदी कामांचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटने करण्यात आली. तर काही ठिकाणी भूमिपूजने करून विकासाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या विकासकामांमुळे भिवंडी ग्रामीण परिसराचा कायापालट होणार आहे.

भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी, अनगाव, कांबे, जुनांदुर्खी, पायगाव, धामणगाव, वडपे, भादाणे, वाशेरे, भावाळे, अंजुर, भडोरी, कोपर आणि काल्हेर येथे झालेल्या कार्यक्रमात विविध विकासकामांची लोकार्पणे करण्यात आली. तसेच काही ठिकाणी भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमानिमित्ताने भिवंडी ग्रामीण भागात जल्लोषमय वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमांना आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, मोहन अंधेरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती किशोर जाधव जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य, सरपंच आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.
प्रसिद्ध धार्मिक स्थळ वज्रेश्वरी मंदिराच्या पायऱ्यांवर शेड बसवून परिसराचे सुशोभीकरण, अकलोली येथील नदीलगतच्या रस्त्याला संरक्षक भिंत व परिसराचे सुशोभिकरण आदींची पाच कोटींची कामे, राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या वतीने अनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, कांबा येथे एक कोटींचा रस्ता, पायगाव येथील अमृत सरोवर तलाव योजनेतून पाच कोटी रुपये खर्चून सुशोभिकरण व सुमारे १ कोटी ८५ लाखांची नळ पाणीपुरवठा योजना, काल्हेर ते टेमघर कॉंक्रीट रस्ता, धामणगाव येथे रस्ते व तलाव, धामणगाव येथे व्यायामशाळा, कोपर येथे अंगणवाडी, जिम आणि महिला समाजगृह आदी कामांचे लोकार्पण करण्यात आले.