भिवंडी : ८४२ कोटींचा अर्थसंकल्प महासभेत सादर

शहराच्या सर्वांगीण विकासाचा स्थायी समिती सभापतींचा दावा

भिवंडी : भिवंडी महापालिकेचा सन २०२२ – २३ या आर्थिक वर्षाचा ८४२ कोटी २९ लाख ४७ हजार रुपये रक्कमेचा अर्थसंकल्प बुधवारी झालेल्या विशेष अर्थसंकल्पीय महासभेत स्थायी समितीचे सभापती संजय म्हात्रे यांनी महापौर प्रतिभा पाटील यांच्याकडे सादर केला.

या अर्थसंकल्पात एकूण महसूल उत्पन्नातून बांधील खर्च वजा जाता उर्वरीत रक्कमेवर पाच टक्के रक्कम  दुर्बल घटक, महिला बाल कल्याण, अंध दिव्यांगां कल्याण या अंतर्गत  प्रत्येकी 86 लाख 30 हजार रक्कम ठेवण्यात आली आहे . रस्ते व पदपथ दुरुस्तीसाठी नऊ कोटींची तरतूद ठेवण्यांत आलेली आहे. मनपा इमारती दुरुस्तीसाठी पाच कोटी 68 लाख 97 हजार , वार्षिक निविदा रोड मटेरिअल,चेंबर झाकणांसाठी तीन कोटी 75 लाख 87 हजार तर मनपा इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट तीन कोटी, दिवाबत्ती दुरुस्ती व देखभाल या लेखाशिर्षाखाली दोन कोटी, नगरसेवक निधी आठ कोटी 95 लाख 16 हजार, महापौर निधी दोन कोटी, उपमहापौर व स्थायी समिती सभापती प्रत्येकी 50 लाख व पाच प्रभाग समित्यांसाठी प्रत्येकी एक कोटी, आठ कोटीची तरतूद आरोग्य विषयक जंतूनाशक व इतर वस्तू खरेदीसाठी, दोन कोटी इतकी तरतूद घनकचरा व्यवस्थापनासाठी, 15 कोटी निवडणूक खर्चासाठी 10 कोटी इतकी तरतूद ठेवण्यांत आली आहे.

नवीन इमारत बांधण्यासाठी तीन कोटी 60 लाख इतकी तरतूद ठेवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन पुतळा उभारणे कामी रक्कम तीन कोटीची तरतूद करण्यात आली आहे. शहरात नविन रस्ते व फुटपाथ बांधण्यासाठी पाच कोटी 74 लाख तर नाले व गटार दुरुस्तीसाठी तीन कोटी 90 लाख इतकी तरतूद ठेवण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देण्यात आले आहे, असे स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केले. या नंतर दुपारच्या सत्रात अंदाजपत्रकावर चर्चा सुरू झाली.

या विशेष अर्थसंकल्पीय महासभेस पालिका आयुक्त सुधाकर देशमुख , अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपमहापौर इम्रानवली मोहम्मद खान, सभागृह नेता सुमित पाटील, कोणार्क विकास आघाडी गटनेते विलास पाटील, काँग्रेस गटनेते शकील पापा,  उपायुक्त दीपक झिंजाड, उपायुक्त दीपक पुजारी, शहर अभियंता एल.पी. गायकवाड, लेखा व वित्त अधिकारी किरण तायडे, मुख्य लेखा परीक्षक श्रीकांत अनारसे, बांधकाम लेखा परीक्षक काशिनाथ तायडे, नगरसचिव अनिल प्रधान, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांच्यासह पालिका अधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.