भाईंदर: श्री प्रभू रामलल्लाचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारीला अयोध्या शहरात होणार आहे. त्यामुळे देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. भाईंदर पूर्व जैसल पार्क चौपाटीच्या बालाजी मैदानावर मीरा-भाईंदर भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड. रवी व्यास आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
भाईंदर पूर्व जेसलपार्कमध्ये अयोध्या धामची हुबेहूब प्रतिकृती असलेले 80 फूट उंचीचे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात रामदरबारही सजवण्यात आला असून 22 ते 28 जानेवारी या कालावधीत भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
अयोध्येतील श्री प्रभू रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी पूजा आणि महाआरतीने याची सुरुवात होणार असून अयोध्येत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपणही मोठ्या स्क्रीनवरून भाईंदरमध्ये लोकांना पाहता येणार आहे. संध्याकाळी संकल्पसह दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. श्री प्रभू रामलल्लाच्या नावाचा दिवा सात दिवस प्रज्वलित करण्यात येणार असून दररोज सकाळी व सायंकाळी महाआरती होणार आहे.
दररोज भजन कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये विविध संस्था आणि गटांच्या माध्यमातून सादरीकरण केले जाणार आहे. या सोहळ्याचे मुख्य संयोजक ॲड. रवी व्यास यांनी सांगितले की, ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आणि प्रतिक्षेनंतर हा ऐतिहासिक क्षण आला आहे आणि अशा परिस्थितीत प्रत्येक रामभक्ताला त्याचे साक्षीदार व्हायचे आहे, परंतु यावेळी सर्वांसाठी व्यवस्था करणे शक्य नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना घरातच राहून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
इथे राहून या संपूर्ण घटनेचे साक्षीदार व्हावे आणि साजरे करता यावे, यासाठी ही भव्य प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या संपूर्ण महोत्सवादरम्यान सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील कलाकारही आपली उपस्थिती दर्शवणार आहेत. या आयोजनात रवी व्यास, कमल पोद्दार आणि संदीप अग्रवाल यांचा मोठा वाटा आहे.