भाईंदर पूर्वेकडील मासळीबाजार ओस

मासळी विक्रेते जेसलपार्क रस्त्यावर

भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेने भाईंदर पूर्व येथील जैसलपार्क येथील चौपाटीसमोर मासळी विक्रेत्यांसाठी मार्केट बांधले होते. लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या मार्केटचे आजपर्यंत उद्घाटन झाले नाही आणि त्या मार्केटमधील मासळी विक्रेतेही स्थलांतरित झाले नाहीत, त्यामुळे वर्षानुवर्षे रिकामे पडलेले हे मार्केट वापरा अभावी मोडकळीस आले आहे. या मार्केटच्या बांधकामाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे.

भाईंदर पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळ, जैसल पार्क चौपाटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला रेल्वे मार्गाला समांतर मासळी विक्रेत्यांचा बाजार आहे. याच मार्गाने दररोज शेकडो लोक मॉर्निंग वॉक आणि पिकनिकसाठी चौपाटीवर जातात. मासळी मार्केटमधील घाण आणि दुर्गंधीमुळे तेथून जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत होता. त्याचबरोबर वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली होती. त्यामुळे जेसल पार्क चौपाटीवर खाडीला समांतर असलेल्या एसटीपी प्लांटजवळ लाखो रुपये खर्च करून मासळी मार्केट बांधण्यात आले. हे मासळी मार्केट ज्या ठिकाणी आहे तेथे ग्राहकांना पोहोचणे अवघड आहे किंवा ग्राहक मासळी खरेदीसाठी इतक्या दूर जाणार नाहीत, त्यामुळे मासळी विक्रेत्यांनी त्या मार्केटमध्ये जाण्यास नकार दिला आहे. परिणामी वापराअभावी बांधकाम केलेल्या गाळ्यांची पडझड झाली आहे.