शहापूर: मागील अनेक वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत राहिलेल्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण पाणीपुरवठा योजनेची वाटचाल आता उज्वल भवितव्याकडे सुरु आहे. किंबहुना भावली नळपाणी पुरवठा योजना टँकरग्रस्त शहापूर तालुक्यासाठी जीवनदायी ठरणार आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत २१ मार्च २०२२ च्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली व त्यानुसार निविदा प्रसिध्द करण्यात आली असता प्रतिसाद मिळाला नव्हता. दरम्यान योजनेची अंदाजपत्रके व आराखडे चालू दरसूचीनुसार सुधारीत करुन ३१६ कोटी ४२ लाख २५ हजार ५०७ इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास जलजीवन मिशन कार्यक्रमातंर्गत २८ एप्रिल २०२२ च्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यामुळे दरवर्षी पाणीटंचाईने व्याकुळ होणाऱ्या एकुण ३५६ गाव-पाड्यातील जनतेच्या घशाची कोरड संपुष्टात येणार आहे. माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या स्वप्नातील भावली पाणीपुरवठा योजना असुन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील हे देखील विशेष प्रयत्नशील आहेत.माजी आमदार बरोरा यांनी पाच वर्षे सतत भावली पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता व आजही ते तितक्याच ताकदीने या विषयाचा प्रामाणिकपणे पाठपुरावा करत असल्याचे दिसून येत आहे.
*प्रत्येकाला मिळणार ५५ लिटर पाणी*
जल जीवन मिशनअंतर्गत सन २०२० ते २०२४ पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागांतील कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे.या नवीन योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे.*
योजना चालविणे व देखभाल दुरुस्ती यासाठी येणारा खर्च भागविण्याकरिता संबंधित ग्रामपंचायतीने योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावामध्ये नमूद केल्यानुसार घरगुती, बिगर घरगुती व संस्थात्मक नळजोडणी धारकासाठी पाणीपट्टीचा दर निश्चित करावा व त्यात कालपरत्वे वाढ करण्यात यावी. योजना स्वयंनिर्भर होण्यासाठी आवश्यक पाणीपट्टी निश्चित करणे व त्यात आवश्यकतेनुसार वाढ करणे ग्रामपंचायतीस बंधनकारक राहील. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसभेत स्पष्टपणे सविस्तर माहिती द्यावी व त्यानंतरच योजनेच्या कामास सुरुवात करावी असे सूचित करण्यात आले आहे.
शासनाने पाणी टंचाईचे गांभीर्य लक्षात घेता, भावली पाणी योजनेला लवकरात लवकर सुरुवात करावी. दरवर्षी लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. सदर योजना कार्यान्वित झाल्यास शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई संपुष्टात येण्यास मदत होईल, असा विश्वास पांडुरंग बरोरा यांनी व्यक्त केला आहे.