ठाणे : पुणे येथील कल्याणीनगर अपघाताच्या पार्श्वभूमीवर घोडबंदर रोड परिसरातील पब, बार आणि हॉटेल नियमानुसार बंद करण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करावी. तसेच नियमांचे उल्लंघन करणारी हॉटेल सील करण्याची कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे.
या वेळी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांचीही उपस्थिती होती. पुण्याप्रमाणेच ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरातही रात्री उशीरापर्यंत पब, बार आणि हॉटेल्स सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यापूर्वी मानपाडा येथील कोठारी कंपाऊंडमधील पब, हिरानंदानी मिडोज परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मद्यपी तरुणांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भविष्यात पुणे येथील कल्याणीनगर अपघातासारखी दुर्घटना घडू नये, यासाठी सतर्कता दाखविण्याची गरज आहे, याकडे माजी ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधले आहे.
राज्य सरकारच्या नियमानुसार, घोडबंदर परिसरातील पब, बार आणि हॉटेल सुरू आहेत का, याची भरारी पथकामार्फत तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या संदर्भात ठाणे पोलिसांनी भरारी पथक नियुक्त करून वेळोवेळी हॉटेलची तपासणी करावी. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलचालकांविरोधात तीव्र कारवाई करून वेळप्रसंगी पब, बार आणि हॉटेल सील करण्याची कठोर कारवाई झाल्यास हॉटेलमालकांना जरब बसू शकेल, असे मत निवेदनात व्यक्त करून नियमभंग करणाऱ्या पब, बार आणि हॉटेलवर कारवाईची मागणी केली आहे.