ठाणे: ठाण्यात असलेल्या परीक्षा केंद्रांवर कॉपीच्या घटना टाळण्यासाठी जिल्हाधिका-यांची भरारी पथकांचा ‘वॉच’ असणार आहे शिवाय शासकीय सेवेतील क्लास वन अधिका-यांनाही २४ तास चौकस राहावे लागणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
इ. १२ वीची परिक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्चपर्यंत आणि इ. १० वीची परिक्षा २ मार्च ते २५ मार्चपर्यंत होणार आहेत. यावर्षी इ. १० वीला ३३२ केंद्रांवर एकूण एक लाख १६ हजार ५४२ विद्यार्थी बसले असून, इ. १२ वीला १७३ केंद्रांवर एक लाख चार हजार ५६१ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत.
परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवण्यात येणार शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या अधिपत्याखाली भरारी पथके नेमण्यात आली आहेत.
ठाणे जिल्ह्यात निकोप, तणावमुक्त तसेच कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांना सहकार्याचे अवाहन मनुज जिंदाल यांनी केले आहे. कोणत्याही परीक्षा केंद्रांवर कॉपीच्या घटना टाळण्याकरीता भरारी पथके स्थापन केली असून त्यात पाचजणांचा समावेश आहे. त्यात एका महिलेला समाविष्ट करण्यात आले आहे. अशीच पथके तालुकानिहाय असणार असून, त्यांच्यावर तहसिलदारांचा ‘वॉच’असेल. या सर्वांना ओळखपत्रे देण्यात येतील.
विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास केंद्र संचालक आणि बोर्ड निर्णय घेणार आहे. संबंधित विद्यार्थी दोषी आढळल्यास त्याला सलग तीन वर्षांसाठी परिक्षेला बसता येणार नाही. एखाद्या विद्यार्र्थ्याने ‘लेखनिक’ची (रायटर) मागणी केल्यास त्याची मुभा परिक्षा मंडळाने दिली असून, १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असल्याने ते निश्चितच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतील. परंतू, काही विद्यार्थी नापास झाल्यास त्यांनी अपयशामुळे खचू नये, असे आवाहन परिक्षा मंडळाने केले आहे.