भातसाच्या कालव्याला भगदाड; लाखो लीटर पाणी शेतात

शहापूर : भातसा धरणापासून १५ किमी अंतरावर आवरे गावाजवळ बुधवारी पहाटे उजव्या कालव्याला भलेमोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी शेतात शिरून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

पाणी शिरल्याने ५० हून अधिक शेतकऱ्यांचे किमान १०० एकर क्षेत्रातील भातशेती व भाजीपाल्याची नासाडी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. किमान ४० वर्षे जुना झालेल्या भातसा उजवा कालव्यातून पाण्याची प्रचंड प्रमाणात गळती होत आहे.

या कालव्याला कुठे न कुठे भगदाड पडून लाखो लिटर पाण्यासह शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होत आहे. ७०० क्युसेक्स क्षमता असलेल्या उजव्या कालव्यातून अवघे २५० क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले होते. तरीही बुधवारी पहाटेच्या सुमारास भातसा कालव्याला आवरे गावाजवळ कालव्याल भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी आवरे गावातील ५० हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतात शिरून भातशेती व भेंडी लागवडीची किमान १०० एकर क्षेत्राची नासाडी झाली असल्याचा अंदाज तेथील शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.

दरम्यान, रब्बी हंगामासाठी सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले असून आता आवरे गावाच्यापुढे असलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे व भाजीपाल्याचे पाण्याअभावी नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. भातसा धरण विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. भगदाड पडलेल्या ठिकाणी भरावाचे काम तातडीने करण्यात येणार असल्याचे उपअभियंता ढोकणे यांनी सांगितले.