ठाणे: देशातील आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान मागील वर्षी १५ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरु केला होता. या अभियानाचा दुसरा टप्पा २५ ऑगस्ट पासून सुरु करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून नोडल अधिकारी म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
अभियानाच्या दुसऱ्या टप्यात आदिम वस्ती असलेल्या शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण व अंबरनाथ या तालुक्यांमध्ये विविध विभागांच्या सहकार्याने योजनांचा लाभ देण्याची सुरुवात करण्यात आली असून या अभियानांतर्गत २९ ऑगस्ट २०२४ ते ४ सप्टेंबर २०२४ पर्यंत शहापूर तालुक्यात अघई, खर्डी, वेळूक, शिरोळ, लाहे, शेणवे मुरबाड तालुक्यात पळू, टोकावडे, सरळगाव, धसई, शिवळे, भिवंडी तालुक्यातील नांदिठणे, अंबाडी, कुरुंद, दाभाड, एकसाल व अंबरनाथ तालुक्यातील काराव येथे जनमन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व शिबिरात रेशनकार्ड २५५, आधारकार्ड ३५६, पी एम किसान सन्मान कार्ड १३१, घरकुल योजना २९२, पी.एम. मातृवंदन १२, सिकलसेल तपासणी ३६३, आयुष्यमान भारत कार्ड ८८, आया कार्ड ७५, उत्पन्न दाखला १६४, जातीचा दाखला १०७६, उज्वला गॅस योजना ४१, पी.एम. विश्वकर्मा योजना ०१, सामाजिक सुरक्षा योजना (पी.एम. विमा) १२, पी. एम. जनधन जीवन ज्योती ०१, पी.एम. जनधन योजना ०६, पी.एम. नॅशनल योजना २६, पी. एम. सुरक्षित माता योजना १२, लेक लाडकी योजना १४, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे एकूण २ हजार ९५६ लाभार्थ्याना योजनेचा लाभ देण्यात आला.
या शिबिराच्या यशस्वीततेसाठी प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी तथा या अभियानाच्या नोडल अधिकारी श्रीम. तेजस्विनी गलांडे या काम पाहत आहेत. १३ सप्टेंबर २०२४ रोजी शहापूर तालुक्यात डोळखांब, मुरबाड तालुक्यात म्हसा, भिवंडी तालुक्यातील वडवली, कल्याण तालुक्यातील खडावली या ठिकाणी पी.एम.जनमन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून येथील शिबिराचा लाभ या ग्रामपंचायत परिसरातील आदिम जमातीच्या व्यक्तींना होणार आहे.