राजभवनावर जाण्याआधीच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना रोखले

आ. जितेंद्र आव्हाडांसह कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

ठाणे : मुंबई, ठाणे आणि मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्‍या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राजभवनावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना आनंद नगर येथेच अडवून ताब्यात घेतले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी बसगाड्या सोडून रस्त्यावरुन चालत जाण्याचा प्रयत्न केल्याने हाय-वे वरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई, ठाणे आणि मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून कोश्यारी हे आक्षेपार्ह विधाने करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधाने केली होती. याचा निषेध करण्यासाठी तसेच कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन हटविण्यात यावे, या मागणीसाठी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक तथा शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, संजय वढावकर, ठाणे-पालघर महिला विभागिय अध्यक्षा ॠता आव्हाड, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुहास देसाई, माजी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, प्रमिला केणी, अशरफ पठाण (शानू) यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजभवनाच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांविरोधात घोषणा दिल्या.

सकाळी 11.30च्या सुमारास शेकडो कार्यकर्त्यांनी विविध वाहनांसह मुंबईच्या दिशेने कूच केले. मात्र, आनंद नगर येथेच पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अडविले. त्यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रस्त्यावर उतरुन चालत जाण्याचा पवित्रा घेतला. परिणामी, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर कोपरी पोलिसांनी डॉ. आव्हाड, आनंद परांजपे, ॠता आव्हाड, नजीब मुल्ला यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

भारताची औद्योगिक क्रांती ठाण्यातून झाली आहे. कॅडबरी, रेमंड, कोरेस, पेपर प्रॉडक्ट, बायर, सँडोज्, वायमन गार्डन या सर्व कंपन्या ठाण्यात होत्या. महाराष्ट्राचा इतिहास माहित नसलेले लोक येतात आणि महाराष्ट्राबद्दल वाटेेल ते बोलतात; मराठी माणसाचा अपमान आता मराठी माणूस सहन करणार नाही. ब्रिटिशांना जेव्हा पैशाची गरज भासत असे तेव्हा गिरगावाचे नानाशंकर शेठ ब्रिटीशांना कर्ज द्यायचे. महाराष्ट्रात उद्योग धंदे उभारले गेले. मराठी माणसाने कष्ट केले, घाम गाळला, तेव्हा या मातीतून पैसा निर्माण झाला. भलेही तो त्यांच्या हातात गेला असेल; पण, इथे घाम कोणी गाळला आहे, हे फक्त इतिहासाला माहित आहे. आता बाहेरची माणसे येऊन तुमच्या तोंडावर थुंकायला लागली आहेत. तुम्हाला भिकारी म्हणताहेत त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी एल्गार पुकारु या, असे आवाहन आव्हाड यांनी मराठी बांधवांना केले.

या आंदोलनात शहर महिलाध्यक्षा सुजाता घाग, महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, मोरेश्वर किणे, दिगंबर ठाकूर, अपर्णा साळवी, वर्षा मोरे, राधा जाधवर, वनिता घोगरे, आरती गायकवाड, अंकिता शिंदे, वहिदा खान आशरीन राऊत, परिवहन समिती सदस्य शमीम खान, नितीन पाटील, प्रकाश पाटील, मोहसिन शेख , युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.